सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ अभियान सुरू | पुढारी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ अभियान सुरू

ओरोस :  पुढारी वृत्तसेवा : जिल्हा शिक्षण विभागाने शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षण प्रवाहात दाखल करण्यासाठी 5 ते 20 जुलै या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे.

जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. जि. प. मार्फत यापूर्वी जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून शंभर टक्के बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल झाली नाहीत, तसेच काही बालके मधूनच शाळा सोडताना दिसत आहेत. या मोहिमेंतर्गत शाळेत दाखलपात्र विद्यार्थ्यांची शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश करून त्याचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू करणे व विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणणे हा या मिशनचा प्रमुख उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालकल्याण, कामगार विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक, सार्वजनिक आरोग्य, गृहविभाग या विभागातील अधिकार्‍यांच्या सहभाग असणार आहे. शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित मुलांचा शोध घेऊन त्यांच्या जवळच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणी बाजार, वीटभट्टी, दगडी खाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरित कुटुंबामधून करण्यात याव्यात. मागासवर्गीय, वंचित घटक व अल्पसंख्याक गटातील वस्तीतील बालकांची माहिती घेण्यात यावी. सर्व वाडी, खेडेगाव, तांडे, शेती मळ्यात, जंगलात वास्तव्य शाळाबाह्य पालकांचा सर्वेक्षणांमध्ये समावेश करावा, असे निर्देश या मोहिमेंतर्गत देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणामध्ये अंगणवाडी ताई काम करणार आहेत. यासाठी संनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक, पोलिस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास अधिकारी, कामगार आयुक्‍त, जि. प. माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सदस्य राहणार आहेत.

तालुकास्तरीय समितीत अध्यक्ष तहसीलदार असून यामध्ये गटविकास अधिकारी, पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी सदस्य राहणार आहेत. केंद्रस्तरीय समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख असून निवडक पाच शाळांच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विषयतज्ज्ञ, केंद्र शाळा मुख्याध्यापक हे सदस्य राहतील. गावसमितीचे अध्यक्ष सरपंच असून पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका हे सदस्य राहतील. मिशन झिरो ड्रॉप आऊटमध्ये महसूल ग्रामविकास सह सर्व विभाग आंणि पालकांनी सहकार्य करावे व हे मिशन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन ही जि. प. शिक्षणाधिकारी
महेश धोत्रे यांनी केले आहे.

Back to top button