नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ब्रिटनमध्ये मुख्यालय असलेल्या स्विस ट्रफलगार या लक्झरी हॉटेल्सची साखळी भारतात दाखल झाली असून, यात देशातील पहिले हॉटेल सुरू करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा येथे हे हॉटेल उभारण्यात येत असून, त्याकरिता पहिल्या टप्प्यात 15 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तर देशभरात 100 कोटींच्या गुंतवणुकीची योजना हॉटेल व्यवस्थापनाकडून आखण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये आलिशान खोल्या, बँक्वेट, क्लब आणि कॅफेद्वारे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
स्विस ट्रफलगारमध्ये 12 एकर ग्रीन लॉनचा समावेश असून, येथे कोणत्याही कौटुंबिक किंवा कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी एक हजार पाहुण्यांची क्षमता आहे. सोबत भव्य स्विमिंग पूल असणार आहे. हॉटेलमध्ये 100हून अधिक लक्झरी आणि प्रशस्त खोल्या आहेत. बहुतेक खोल्यांमध्ये सर्व मानक सुविधांसह किंग-आकाराचे बाथटब आहेत. स्विस ट्रफलगारने नाशिकमधील रहिवासी आणि स्थानिकांना जागतिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी येथे कॅफे उघडले आहे. त्यात आशियाई, युरोपियन, दक्षिण व उत्तर भारतीय पारंपरिक पदार्थ असतील. नाशिकमधील पहिलेच थीम-आधारित क्लबदेखील येथे होणार असून, प्रारंभानिमित्त अनेक आकर्षक योजना आणण्यात येतील.
महिलांसाठी नवी संकल्पना
स्विस ट्रफलगारतर्फे विशेषत: महिलांसाठी एक संकल्पना आणली आहे. यामध्ये खास महिला प्रवाशांना समर्पित असलेला विभाग या हॉटेलमध्ये असेल. या विभागात फक्त महिला कर्मचार्यांकडूनच सेवा दिली जाईल. या विभागात कोणत्याही पुरुषांना परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे एकट्याने राहणार्या महिला प्रवासी यांना सुरक्षित वातावरण मिळेल. ही अनोखी संकल्पना साकारणारे हे नाशिकमधील पहिले लक्झरी हॉटेल आहे.
हॉटेलमध्ये जागतिक दर्जाला अनुरूप बाबी साकारण्यात येत आहेत. लवकरच ते ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार आहे. यामध्ये काम करणारे कर्मचारी हे अनुभवी व प्रशिक्षित असून, ते ग्राहकांना पूर्ण संतुष्टी देतील. हॉटेलचे सुयोग्य लोकेशन, आनंददायी आणि सुखदायक वातावरण, हिरवागार परिसर आणि प्रशिक्षित टीम यामुळे ग्राहकांना समाधानाची अनुभूती मिळेल.
– अश्विन भारद्वाज, महाव्यवस्थापक