लवंगी मिरची : मलईदार खाती म्हणजे काय रे भाऊ? | पुढारी

लवंगी मिरची : मलईदार खाती म्हणजे काय रे भाऊ?

मलईदार म्हणजे काय रे भाऊ?
भरपूर मलई असलेले.
मलई म्हणजे काय रे भाऊ?
मलई माहीत नाही? आपण दूध आणतो, तापवतो, ते थंड होतं, तेव्हा त्याच्यावर जी जाड साय धरते तिला मलई म्हणतात.
ती होय? माहितीये; पण आमच्याकडे नाही बुवा फारशी जाड साय धरत.
तुम्ही गायीचं दूध आणत असाल. त्याच्यावर फारच पातळ साय जमते.
हो ना! पण, काही म्हणा, खरपूस तापलेल्या दुधावरची साय, साखरबिखर घालून किती छान लागते नाही? अहाहाऽऽऽ
हे माहितीये ना? म्हणजे तुम्हाला मलईदार दूध ठाऊक आहे म्हणा की!
आहे थोडं; पण मलईदार खाती म्हणजे काय ते कळंना झालंय.
कोण म्हणतं खाती मलईदार असतात, असं? म्हणजे उघडपणे कोण म्हणायला धजतं असं?
संजय राऊत म्हणतात.
मग ठीक आहे. ते कुठेही काहीही म्हणण्यात माहीर आहेत.
पण, मुख्यमंत्रीसुद्धा तसंच म्हणलेत.
छे! हे पटत नाही. किंबहुना नाहीच पटत, मी तर म्हणेन पटूच नये.
ते जाहीरपणे म्हणालेले आहेत की, एवढी मलईदार खाती दिली, तरी काही मंत्री जायचे ते गेलेच.
गेले म्हणजे वरती का?
नाही. गुवाहाटीवरती.
बाबो, ही कोणती मलईदार खाती असतील बरं?
तसं स्पेशल मेन्शन केलं नाहीये त्यांनी; पण उद्योग, रस्ते बांधकाम, महसूल, नगरविकास अशी खाती असतील कदाचित.
अच्छा, म्हणजे जी खाती सांभाळताना मंत्र्यांचा व्यक्‍तिगत विकासही आपोआप होत जातो ती?
हे आपण समजून घ्यायचं.
मग, इतर खाती म्हणजे मलईखालचं पाणचट दूध का?
सगळ्या गोष्टी म्हणायच्या नसतात रे भाऊ! सारखं प्रत्येक गोष्टीवर काही ना काही म्हणत बसायला आपण संजय राऊत थोडेच आहोत?
ते तर झालंच; पण मी काय म्हणतो, मलईदार खाती पटकावायला अगोदरपण मलई चारावी लागत असेल ना?
शक्य आहे.
शिवाय इतर मांजरी, बोक्यांपासून आपली मलई वाचवावी लागत असणार. ते तर टपलेलेच असणार जिभा चाटत.
हो तर; पण आपल्याकडे शक्यतो कोणालाच पूर्ण नाराज करत नाहीत. ‘सगळे मिळूनी खाऊ’ असा दंडकच आहे.
पण, सगळ्यांना पुरेल एवढी मलई नसेलच तर?
त्याचं काही नाही एवढं. मलई वाढवता येते किंवा दुसर्‍याच्या दुधावरची लाटताही येते.
खालच्या पाणचट दुधाने भूक भागत नाही म्हणून का?
छे हो. आपल्याकडे अनेकांची भूक मुळी कधी भागतच नाही.भस्म्या रोग जडलेला असतो काहींना!
म्हणून त्यांना स्पेशल मलईदार खाती द्यायची का?
हो. निष्ठेचं बक्षीस. जेवढी निष्ठा दाट तेवढी मलई वाट, असं ज्येष्ठांचं धोरणच असतं आपल्याकडे.
तरी बंड होतात ना?
तेच तर दुःख आहे ना! खाणार्‍यांनी मलईही चापली आणि नको तेव्हा दुसर्‍यांची बुटंही चाटली.
थोडक्यात म्हणजे, मलईदार खाती शेवटी धुपाटणीच देतात हाती! मलई परी मलई फस्त होणार आणि निष्ठा बाराच्या भावात जाणार. त्यापेक्षा याच्यापुढे सगळीच खाती शून्य मलईची होवोत आणि सगळ्यांचा घोर जावो!
पटतंय का हे राष्ट्रहिताचं धोरण?

– झटका

Back to top button