Nashik Zilla Parishad : गुणवंतांना अर्थार्जन; जि. प. देणार विद्यावेतन | पुढारी

Nashik Zilla Parishad : गुणवंतांना अर्थार्जन; जि. प. देणार विद्यावेतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2022-23 या वर्षांपासून ‘कमवा आणि शिका’ ही ज्ञान कौशल्यावर आधारित नावीन्यपूर्ण शैक्षणिक योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान-कौशल्ये आत्मसात करून देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या बीबीए (सेवा व्यवस्थापन) या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून 20 टक्के मागासवर्गीय निधींतर्गत विद्यावेतन देण्याचीही योजना राबविली जाणार आहे. योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी आठ हजार रुपये, दुसर्‍या वर्षी नऊ हजार रुपये आणि शेवटच्या वर्षासाठी 10 हजार रुपये विद्यावेतन प्रत्येक महिन्याकाठी दिले जाईल. निवास आणि भोजन खर्चासाठी दरमहा चार हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल. तसेच सलग तीन वर्षे समाधानकारकरीत्या काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसर्‍या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बीबीए ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होईल. ग्रामीण भागातील 18 ते 22 वर्षे वयोगटातील नुकत्याच बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

इच्छुकांनी 5 जुलैपर्यंत https://tinyurl.com/zpnashikibba2022  या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button