नाशिक : अमली पदार्थाविरोधात सायकल रॅलीतून जनजागृती | पुढारी

नाशिक : अमली पदार्थाविरोधात सायकल रॅलीतून जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस आयुक्तालय व नाशिक सायकलिस्टच्या वतीने आयोजित सायकल रॅलीतून अमली पदार्थविरोधात जनजागृतीचा संदेश देण्यात आला. रॅलीत पोलिसांसह सायकलिस्टचे सभासद व नाशिककर सहभागी झाले होते. शहर, राज्य व देश अमली पदार्थमुक्त करण्याची शपथ यावेळी देण्यात आली.

जागतिक अमली पदार्थमुक्त दिनानिमित्त गोल्फ क्लब येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश जगमलानी, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शहर गुन्हे शाखेचे उपआयुक्त संजय बारकुंड यांनी उपस्थितांना आपले शहर, राज्य, देश अमली पदार्थमुक्त करण्याची शपथ दिली, तर शहर पोलिसांच्या संकल्पनेतून सायकलिस्ट फाउंडेशनच्या डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. अजय भन्साळी, साधना दुसाने व त्यांच्या पथकाने ‘मीच माझा वैरी’ हे पथनाट्य सादर केले. त्यानंतर गोल्फ क्लब येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली. तेथे शहरातून अनेक सायकलपटू आले होते. सायकल रॅलीला पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी झेंडा दाखविला. त्यानंतर रॅली मायको सर्कल, चांडक सर्कल, गडकरी चौक, सीबीएस सिग्नल, अशोक स्तंभ, गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड सिग्नल, मायको सर्कलमार्गे पुन्हा गोल्फ क्लब येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रवींद्र मगर, डॉ. मनीषा रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. सहायक आयुक्त वसंत मोरे यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button