

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सध्या राज्यातील नेत्यांचे सूरत, गुवाहाटी येथे दौरे सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात भाजपचीच सत्ता स्थापन होईल, असा दावा भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांचा अभीष्टचिंतन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील संपर्क कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक भगत बालानी, अरविंद देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खा. पाटील म्हणाले की, राज्यातील वाढत्या घडामोडी लक्षात घेता, आपले सरकार स्थापन होणार आहे. त्या माध्यमातून विकासाची पोकळी भरून काढता येणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासाच्या उंचीवर न्यायचे आहे. सध्या राज्यात ज्या काही घडामोडी होत आहेत. त्या द़ृष्टीने आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या हातूनच विठ्ठलाची पूजा होईल, हे सर्व महाराष्ट्र पाहणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह वारकरीदेखील हे द़ृश्य पाहण्यास आतूर झाला असल्याचेही ते म्हणाले.
या योजनांच्या माध्यमातून युवावर्ग हा समाजातील विविध घटकांशी जोडला गेला आहे. ग्रामपंचायत सदस्य पदापासून ते सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा पदांवर तरुणवर्ग कार्यरत आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीचा विचार करताना, समाजातील विविध घटकांची मने जोडणेदेखील महत्त्वाचे आहे. एखाद्या शासकीय योजनेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे जीवन परिवर्तन करून केवळ त्याचे मतच नव्हे, तर मनही परिवर्तित होते. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करताना गोरगरीब जनतेला या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन खासदार पाटील यांनी यावेळी केले.
जनकल्याण यात्रेची माहिती घरोघरी
खासदार पाटील यांनी या वेळी प्रधानमंत्री जनकल्याण यात्रेची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्राच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या योजना समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या अभियानातून केले जाणार आहे.