औरंगाबाद : अंधारी परिसरात पावसाची हजेरी; दुबार पेरणीचे संकट टळले | पुढारी

औरंगाबाद : अंधारी परिसरात पावसाची हजेरी; दुबार पेरणीचे संकट टळले

अंधारी; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल पावणेदोन तास चाललेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील मुख्यत: भोरर्डी व ओढे नाले तुडुंब भरून वाहिले. जून महिना सरत आला तरी परिसरात एकही दमदार स्वरुपाचा पाऊस पडलेला नव्हता. परंतु, या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

शेतात लागवड केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांसमोर असलेले दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने पीक चांगले येते. यामुळे पहिला पाऊस पडताच शेतकऱ्यांनी कपाशी, मका, सोयाबीनसह पेरणी करण्यास सुरुवात केली. यात परिसरातील जवळपास ५० ते ६० टक्के लागवड झाली आहे. परंतु पावसाने गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने कपाशी व मका पिकांवर खपली बसली असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

आधीच अतिशय संकटात असलेल्या शेतकऱ्यांना समोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. परंतु, शुक्रवारी पडलेल्या पावसाने सध्या तरी शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button