नाशिक : महावितरण कंपनीचे वावी कार्यालय जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

नाशिक : महावितरण कंपनीचे वावी कार्यालय जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्राला मंगळवारी (दि. 21) दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. वीज उपकेंद्रातील दुसंगवाडी फिडरने अचानक पेट घेतल्याने या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले. या दरम्यान वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे आग विझविण्यात बरीच मदत झाली.

या वीज केंद्रात वावीसह दुसंगवाडी, पांगरी असे तीन फिडर असून, त्यावर 11 गावे जोडली आहेत. अशा परिस्थितीत पावसामुळे व अचानक आलेल्या उच्च दाबामुळे वावी वीज उपकेंद्रातील दुसंगवाडी फिडरने अचानक पेट घेतला. प्रभारी नियंत्रक सुयोग धुमाळ, लाइनमन अक्षय खुळे घटनास्थळी उपस्थित होते. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने या दोघांची मोठी धांदल उडाली. त्यांनी गावातील काही तरुणांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, प्रवेश करण्यासाठी जागा नसल्याने मुख्य प्रवेशद्वार तोडून पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. आग विझविण्यासाठी पावसाच्या पाण्याचा मोठा हातभार लागला.

सहायक वीज अभियंता अजय सावळे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाचे कर्मचारी लाला वाल्मिकी, जयेश बोरसे, मंगेश कटारे, लक्ष्मण खैरे आदींच्या पथकाला बोलावून आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत कार्यालयातील अनेक वस्तू, नवीन व जुने वीजमीटर, महागड्या वस्तू जळून खाक झाल्या.

माजी सरपंच विजय काटे, संतोष भोपी, ग्रामपंचायत सदस्य संदीप राजेभोसले, अनंत मालपाणी, भैया काटे, योगेश ताजणे, राकेश आनप, अक्षय खर्डे, गणेश काटे आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केल्याने आग नियंत्रणात आली. कनिष्ठ अभियंता हर्षल मांडवे, अरिफ कादरी, रतन राऊत, स्वाती वनसे कार्यालयात उपस्थित होते.

वावी वीज वितरण कार्यालयाच्या उपकेंद्रावर अचानक उच्च दाब आल्याने दुसंगवाडी फिडरवर अचानक दाब वाढल्याने कदाचित ही घटना घडली असावी. तातडीने टेस्टिंग, तंत्रनिकेतन, वायरमन बोलावले असून, वावीसह तीनही फिडरवरील वीज रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अजय सावळे,
शाखा अभियंता, महावितरण

हेही वाचा :

Back to top button