नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
वासोळ (ता.देवळा) येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. शुक्रवारी (दि.10) येथील शेतकरी भास्कर हरी अहिरे यांच्या मालकीच्या गट नं.513 मध्ये बिबट्याने म्हशीच्या पायडीला भक्षक बनविले.
वासोळ परिसरात महिलेवर बिबट्याचा हल्ला होऊन महिना उलटला नसून काल दि.9 रोजी देखील बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. भास्कर अहिरे यांच्या म्हशीच्या पायडीला बिबट्याने ठार केल्याने परिसरातील नागरिक घबराटीचे हैराण झाले आहेत अहिरे यांचे अठरा हजार इतके पशुधनाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.शेतकर्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असता वनविभागाचे कर्मचारी भामरे आणि मोरे यांनी आमच्याकडे पिंजरा उपलब्ध नाही आम्ही पिंजरा लावू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. वरिष्ठांनी लक्ष देऊन पिंजरा लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.