नाशिकमध्ये दिवसाला एकावर जीवघेणा हल्ला, नागरिक दहशतीत | पुढारी

नाशिकमध्ये दिवसाला एकावर जीवघेणा हल्ला, नागरिक दहशतीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शांत अन् कायदा सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणार्‍या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सडकछाप गुंडांनी अक्षरश: हैदोस मांडला असून, दररोज एकावर प्राणघातक हल्ल्याची नोंद पोलिस ठाण्यात होत आहे. जणू काही कायद्याचा धाक उरलाच नाही, अशा आविर्भावात गुंडांकडून दहशत माजविली जात असून, खुनांच्या घटनांनीही शहर हादरत आहे. या गुंडांचा कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नाशिककरांकडून केली जात आहे.

शहरात खुनांच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येऊ लागल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. त्यानंतर पोलिसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. शहरातील विविध भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनसह गस्त वाढविण्यावर पोलिसांकडून भर दिला जात आहे. मात्र, अशातही गुंडांवर म्हणावी तशी जरब बसली नसल्याचेच चित्र आहे. बुधवारी (दि. 8) नाशिकरोड परिसरात एका डॉक्टरसह एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आल्यानंतर, पोलिसांचा धाक कमी झाल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दरम्यान, गेल्या 1 मे पासून ते आजतागायत शहरात जीवघेण्या हल्ल्याच्या 48 घटनांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश घटना किरकोळ वादातून घडल्या असून, हल्लेखोर वीस-बाविशीतील असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनांमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून, घराबाहेर पडताना अजिबातच सुरक्षिततेची भावना होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. कोण, कधी धारदार शस्त्राने वार करेल अशी सध्या शहरात स्थिती असल्याने, पोलिसांनीच आता नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची गरज आहे.

घरफोड्या नित्याच्याच
गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असून, बहुतांश घटनांमधील चोरटे अजूनही पोलिसांना पोबारा देत आहेत. सातपूरसह नाशिकरोड, पंचवटी, सिडको या भागात घरफोड्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या पोलिस या प्रकरणातील चोरट्यांच्या मागावर असले तरी, काही घटनांमधील धागेदोरेही अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चोरटेही निर्ढावल्यागत घरफोड्या करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

अल्पवयीन गुन्हेगार
गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेल्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. टोळी करून हे अल्पवयीन गुन्हे करत आहेत. त्याचबरोबर वीस-बाविशीतील तरुणांचाही या घटनांमध्ये सहभाग आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश गुन्ह्यांमधील संशयित हे सराईत गुन्हेगार नसल्याने त्यांचा थांगपत्ता लावणे पोलिसांना अवघड होत आहे.

हेही वाचा :

Back to top button