निरा नदी पुलावरील संरक्षक कठडे बांधा; जिल्हाधिकारी यांचे प्रशासनाला आदेश, पालखी तळ व मार्गाची केली पाहणी | पुढारी

निरा नदी पुलावरील संरक्षक कठडे बांधा; जिल्हाधिकारी यांचे प्रशासनाला आदेश, पालखी तळ व मार्गाची केली पाहणी

निरा, पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यातील निरा येथील पालखीतळ व माउलींचा पालखी सोहळा ज्या रस्त्याने मार्गस्थ होणार आहे, त्या ; रस्त्यावरील ‘त्या’ चेंबरनजीकच्या धोकादायक मोठ्या खोल खड्ड्याची तसेच निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या.

पुणे जिल्ह्यातील हडपसर ते निरा यादरम्यानच्या पालखी मार्गावरील मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणची पाहणी बुधवारी (दि. 8) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. या वेळी हडपसर ते निरा यादरम्यानच्या पालखी मार्गावरील अपेक्षित अशी सर्व कामे 10 तारखेपूर्वीच पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी निरा येथे दिली.

सरकारने खरेदी केली एक रुपयात 336 गुंठे जमीन; प्रकल्पग्रस्तांना हुसकावल्याने कामथडी येथे कारवाई

या वेळी देशमुख म्हणाले की, सासवड येथील कर्‍हा नदीवरील पुलाच्या कामाला थोडा वेळ लागू शकतो. या ठिकाणी थोडे भूसंपादन बाकी आहे. मात्र, या पुलावर स्लॅब टाकण्याचे काम 14 तारखेपूर्वी होईल. 20 तारखेपर्यंत हा पूल वापरात येऊ शकतो. वाल्हे येथील रेल्वेच्या कामाबद्दल रेल्वेच्या अधिकार्‍यांशी बोलणे झाले आहे. तेदेखील काम मार्गी लागणार आहे. पालखी सोहळ्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे.

या वेळी जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, मंडलाधिकारी संदीप चव्हाण, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, सदस्य अनिल चव्हाण, तलाठी सुनील पाटोळे, ग्रामसेवक मनोज डेरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मतांसाठी सरपंच रोखत नाहीत बालविवाह; रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली खंत

जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी पालखी मार्गाची पाहणी केली. त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, त्या आम्ही त्यांना दाखविल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला त्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने सासवडच्या कर्‍हा नदीवरील पूल, वाल्हे पालखीतळाशेजारी सुरू असलेले रेल्वेचे काम आणि पिसुर्टी येथील अरुंद रस्ता, याबाबत आम्ही जिल्हाधिकार्‍यांशी बोललो आहोत. त्यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा पाहणी करणार आहोत.
– अ‍ॅड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळाप्रमुख

 

Back to top button