नाशिक : 67 गटांच्या प्रारूप बदलांमुळे प्रस्थापित राजकारणाला धक्का | पुढारी

नाशिक : 67 गटांच्या प्रारूप बदलांमुळे प्रस्थापित राजकारणाला धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेल्या गट व गण रचनेच्या प्रारूप आराखड्यांमुळे 84 पैकी 67 गट व 134 गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. यामुळे संबंधित गट व गणांमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. अद्याप गट व गणांची रचना अंतिम झालेली नाही, तसेच आरक्षणही जाहीर होणार असले तरी गट गावांची संख्याही बदलली असल्यामुळे तेथील प्रस्थापित राजकारणाला मोठा धक्का बसणार आहे.

जिल्हा परिेषदेत अनेक वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर 1992 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी गट व गणांच्या रचनेत बदल करण्यात आले होते. त्यानंतर एखाद दुसर्‍या गटांच्या रचनेतील बदल वगळता बहुतांश गट कायम होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, यावेळी राज्य सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट व गणांची संख्या 2011 च्या जनगणनेनुसार वाढवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील गटांची व गणांची संख्या वाढल्याने 67 गटांची रचना बदलली आहे. त्यात अनेक गट नव्याने अस्तित्वात आले असून, त्यासाठी जुन्या गटांमधील गावांची अदलाबदल झाली आहे. यामुळे 30 वर्षांची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत.

दिग्गजांचे गट बदलले
गटांची संख्या वाढल्यामुळे नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, निफाड या तालुक्यांमधील गटांची पुनर्रचना झाल्यामुळे अनेक माजी सदस्य व पदाधिकार्‍यांच्या गटांची रचना बदलली आहे. या गटांमधील राजकीय आरक्षण अद्याप निश्चित नसले तरी या बदललेल्या गट रचनेमुळे या नेत्यांना पहिल्यापासून तयारी करावी लागणार आहे. या गट बदललेल्यांमध्ये प्रामुख्याने माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भास्कर गावित, रामदास चारसकर, धनराज महाले, डॉ. सयाजी गायकवाड आदींचा समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button