कोल्हापूर :  जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रारूप मतदारसंघ जाहीर | पुढारी

कोल्हापूर :  जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रारूप मतदारसंघ जाहीर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचे 76 आणि पंचायत समितीचे 152 प्रारूप मतदार संघ गुरुवारी जाहीर करण्यात आले. नव्या मतदारसंघ रचनेनुसार करवीर तालुक्यात दोन मतदारसंघ वाढले. गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि गडहिंग्लज हे तालुके वगळता उर्वरित सात तालुक्यांत जिल्हा परिषदेचे प्रत्येकी एक असे जिल्ह्यात एकूण नऊ तर पंचायत समितीचे प्रत्येकी दोन असे एकूण 18 मतदारसंघ वाढले. आहेत. या नव्या मतदारसंघ रचनेवर बुधवार, दि. 8 जूनपर्यंत हरकत घेता येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन केला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मार्च महिन्यात मुदत संपली आहे. मात्र, प्रारंभी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न यामुळे या निवडणुका झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतदार संघाचे प्रारूप जाहीर केले आहे.

कोल्हापुरात जिल्हा परिषदेसाठी नऊ मतदारसंघ वाढल्याने ही संख्या 67 वरून 76 झाली आहे. त्याचबरोबर पंचायत समितीचे 18 मतदारसंघ वाढल्याने त्यांची संख्या 134 वरून 152 झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत येथे ही प्रारूप रचना पाहता येईल. त्यावर त्यावर हरकती आणि सूचनांवर दि. 22 जूनपर्यंत सुनावणी पूर्ण करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्‍तांना सादर केला जाईल. दि.27 जून रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

पुनर्रचनेनंतर असे असतील नवे मतदारसंघ
करवीर : करवीरमधील यापूर्वीचा सडोली खालसा मतदारसंघ रद्द झाला. हे गाव वाशी मतदारसंघात समाविष्ट केले. गोकुळ शिरगाव, वाशी आणि शिरोली दुमाला असे नवे मतदारसंघ असतील.
शाहूवाडी : करंजफेण मतदारसंघ रद्द करून त्याचा येळवण जुगाईमध्ये समावेश केला. सावे नवा मतदारसंघ असेल.
पन्हाळा : यवलूज मतदार संघ रद्द करून तो पोर्ले तर्फ ठाणेत समाविष्ट झाला. वाडीरत्नागिरी आणि पुनाळ असे दोन नवे मतदारसंघ असतील.
हातकणंगले : हातकणंगले, हुपरी मतदारसंघ रद्द झाले. रुई, हेर्ले आणि टोप असे नवे मतदारसंघ असतील.
शिरोळ : शिरोळ मतदारसंघ रद्द झाला आहे. यड्राव आणि अकीवाट असे नवे मतदारसंघ असतील.
कागल : बानगे हा नवा मतदार संघ असेल.
राधानगरी : कसबा वाळवे मतदारसंघाचा सरवडेत तर कौलवचा ठिकपुुर्लीत समावेश केला आहे. नरतवडे, ठिकपुर्ली व कसबा तारळे असे नवे मतदारसंघ असतील.
चंदगड : चंदगड मतदारसंघ रद्द केला आहे. गवसे हा नवा मतदारसंघ असेल.
आजरा : आजरा आणि कोळींद्रे मतदारसंघ रद्द झाला. कोळींद्रेचा वाटंगीत समावेश करण्यात आला. वाटंगी आणि पेरणोली असे नवे मतदारसंघ असतील.
गडहिंग्लज : बड्याची वाडी मतदारसंघ रद्द झाला. त्याचा समावेश गिजवणेत केला आहे. कसबा नूल नवा मतदारसंघ असेल.
गगनबावडा आणि भुदरगडमध्ये जुनेच मतदारसंघ राहिले.

प्रभाग रचना कार्यक्रम

  • हरकती स्वीकारणार- दि. 2 ते दि. 8 जून
  • हकरतीवरील सुनावणी पूर्ण- दि.21 जून
  • विभागीय आयुक्‍तांना प्रस्ताव- दि.22 जून
  • अंतिम प्रभाग रचना जाहीर- दि.27 जून

Back to top button