

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा :
वाढलेली महागाई व कोसळलेले कांद्याचे बाजारभाव याविरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी चांदवड तालुक्यातील महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरील चांदवड मनमाड एक्स्प्रेस वेवर अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.
येत्या पंधरा दिवसात कांद्याचे बाजारभाव वाढले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी दिला.
या रास्ता रोको आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, सेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, सेनेचे तालुका प्रमुख विलास भवर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील याना देण्यात येऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्ता रोको आंदोलना दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांचे हाल झाले.