नाशिक : गुरुशिवाय आत्मसाक्षात्कार नाही; साध्वी हरिषाजी : मानव उत्थान समितीतर्फे संमेलन | पुढारी

नाशिक : गुरुशिवाय आत्मसाक्षात्कार नाही; साध्वी हरिषाजी : मानव उत्थान समितीतर्फे संमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘मानव जन्म मिळणे म्हणजेच भक्ती करण्याची संधी मिळणे होय. ही संधी परमेश्वराने उपलब्ध करून दिली आहे. परंतु, भक्तीमध्ये आळस करणे म्हणजे आत्म्याशी वैर घेण्यासारखे आहे. गुरुशिवाय आत्मसाक्षात्कार शक्य नाही, असे प्रतिपादन साध्वी हरिषाजी यांनी केले.’

सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीद्वारे सातपूर येथील श्रीहंस ध्यान मंदिर येथे संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनाच्या पहिल्या दिवशीचे पुष्प साध्वी हरिषाजी यांनी गुंफले. यावेळी श्रीहंस कल्याणधामच्या नाशिक प्रबंधक साध्वी हिराजी, वसई येथून आलेले महात्मा मुसाफिरानंदजी, महात्मा सिद्धांतानंद, महात्मा अनासक्तानंद, साध्वी त्रिलोकीजी, साध्वी तिरथजी, साध्वी पंकजाजी आदी उपस्थित होते. साध्वी हरिषाजी म्हणाल्या, भक्तिमार्ग वृद्धापकाळासाठी असल्याचा विचार करणारे लोक आत्मज्ञानापासून ते वंचित राहतात. प्रभू श्री रामचंद्रांनी शबरीला नवविध भक्तीचे महत्त्व सांगितले. भक्तीचे नऊ प्रकार आहेत. मनाला नियंत्रित करणे, जग ईश्वरमय मानणे, इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे, समाधानी राहणे आणि छळविरहीत जीवन जगणे, सर्वांप्रति सद्भावना राखणे हे भक्तीचेच प्रकार आहेत. भक्तिपथावर नित्य चालले तरच अंतकाळीही परमेश्वराची आठवण होते, असे हरिषाजी म्हणाल्या. प्रारंभी सुश्राव्य भक्तिगीतांचा भाविकांनी आनंद घेतला.

हेही वाचा:

Back to top button