नाशिक : फरार लाचखोर वैशाली झनकर पुन्हा लाचलुचपतच्या ताब्यात | पुढारी

नाशिक : फरार लाचखोर वैशाली झनकर पुन्हा लाचलुचपतच्या ताब्यात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : वैशाली झनकर : लाच मागितल्याचा आरोप असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित झनकर या फरार झाल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या आवारात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यास तक्रारदाराकडून ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

त्यानंतर सखोल चौकशी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी सांगितल्यानुसार येवले याने लाचेची रक्कम स्विकारल्याचे समोर आले. त्यामुळे विभागाने झनकर यांनाही ताब्यात घेतले होते. तसेच झनकर यांच्या वतीने तक्रारदारांकडे लाचेची मागणी केल्याबद्दल प्राथमिक शिक्षक पंकज दशपूते यालाही अटक केली.

दरम्यान, महिलेस सायंकाळनंतर अटक करता येत नसल्याने डॉ. झनकर यांना दोन नातलगांचे हमीपत्र लिहून विभागाने घरी सोडले होते.

बुधवारी त्यांना न्यायालयात हजर होणे अपेक्षित असताना त्या फरार झाल्या. त्यामुळे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

त्यानंतर चालक येवले व शिक्षक दशपूते यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत (दि.१३) कोठडी सुनावली होती.

त्यांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, डॉ. झनकर यांनी वकिलांमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विभागाने डॉ. झनकर यांचा शोध सुरुच ठेवला होता.

त्यांना विभागाने ताब्यात घेतल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. त्यांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button