नाशिक : माजी कृषिमंत्री शिंदे यांचे हरितक्रांतीसाठी योगदान : आ.कोकाटे | पुढारी

नाशिक : माजी कृषिमंत्री शिंदे यांचे हरितक्रांतीसाठी योगदान : आ.कोकाटे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
पाडळीचे भूमिपुत्र आणि देशाचे कृषिमंत्री स्व. अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांतीसाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या दूरद़ृष्टीमुळे भारत देश त्यांच्यामुळेच भारत देश अन्नधान्य पिकवण्यासाठी अग्रेसर झाला. त्यांच्या मूळगावी स्मारक होणे, त्यांच्या नावाने अभ्यासिका सुरू होणे, ही बाब सिन्नर तालुक्याच्या द़ृष्टीने अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

पाडळी येथे स्व. अण्णासाहेब शिंदे स्मारक व अभ्यासिकेचे भूमिपूजन तसेच परिसरासाठी सहकारी तत्त्वावरील उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. भगीरथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष सुभाष कुंभार, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मारुती बिन्नर, आर. टी. शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, सरपंच सुरेखा रेवगडे, ए. टी. शिंदे आदी उपस्थित होते. पाडळीचे माजी सरपंच प्रकाश शिंदे यांची मुले किरण व सुरेश शिंदे यांनी अण्णासाहेबांच्या जन्म ठिकाणी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार कोकाटे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. म्हाळुंगी नदीवर जॅकवेल घेऊन त्यातील पाणी पंपाद्वारे उपसा करत जलसिंचन योजनेद्वारे शिंदे मळा, बोगीरवाडी येथील पाझर तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींचे पुनर्भरण होईल. 50 हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही योजनेला सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांनी अण्णासाहेब शिंदे यांचे स्वातंत्र्यसेनानी ते कृषिमंत्री असा प्रवास, त्यांच्या काळात झालेल्या शेती क्रांतीविषयी माहिती दिली. आमदार तांबे, बाळासाहेब वाघ, आर. टी. शिंदे, धनंजय रेवगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चंद्रभान रेवगडे, केशव सहाणे, सरपंच विष्णू पाटोळे, किशोर शिंदे, नारायण जाधव, धनंजय रेवगडे, भगीरथ रेवगडे, पोपट रेवगडे, जलसंधारणचे अधिकारी नारायण डावरे, अविनाश लोखंडे, आदींसह पाडळी, ठाणगाव, हिवरे, पिंपळे गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

‘तवली धरण शेतकर्‍यांच्या हितासाठी’ 
हिवरे येथील तवलीचे धरण बांधणे गरजेचे आहे. हा परिसर डोंगराळ असल्याने पाणी येथे दुसरीकडे वाहून जाते. स्थानिक शेतकर्‍यांना त्याचा फायदा होत नाही. तेव्हा या धरणामुळे पाडळी, हिवरे, टेंभूरवाडी, पिंपळे या गावाचा चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल. येथून पुढे गोदावरी खोर्‍यात पाणी अडवता येणार नाही. 2013 साली हे पाणी आरक्षित केले असल्याने हे धरण परिसरातील शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधत आहोत असे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button