खूनप्रकरणी पाच जणांना अटक | पुढारी

खूनप्रकरणी पाच जणांना अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील संतोष पवार या बुर्जी विके्रत्याचा खून करणार्‍या पाच जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले आहे. सोमवारी पहाटे कोल्हापूर रस्त्यावर पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. पूर्ववैमनस्यातून संतोषचा काटा काढल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

अटक केलेल्यांमध्ये आकाश सचिन शिंदे (वय 19, रा. पन्नासफुटी रस्ता, सांगली), वैभव राजू शिंदे (23, अकरावी गल्ली, जयसिंगपूर), निहाल बशीर नदाफ (23), अकीब सरफराज नदाफ (20, उदगाव, ता. शिरोळ) व सफवान जमीर बागवान (21, शंभरफुटी रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संतोष विश्रामबाग येथे मोती चौकात राहत होता. शंभरफुटी रस्त्यावर डॉ. आंबेडकर वाचनालयासमोर त्याचा बुर्जी विक्रीचा व्यवसाय होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचा संशयित आकाश शिंदे याच्याशी वाद झाला होता. त्यावेळी संतोषने आकाशला मारहाण केली होती. त्यावेळी आकाशने शहर पोलिस ठाण्यात फिर्यादही दाखल केली होती.

आकाश शंभरफुटी रस्त्यावर चौकात बसत असे. संतोष बुर्जी व्यवसाय सुरू करण्यास यायला लागला की, तो आकाशकडे रागाने पाहत असे. त्याच्याकडे डोळे वटारून पाहायचा. गेल्या पंधरा-वीस दिवसात या दोघांमधील खुन्नस अधिकच वाढली होती. त्यामुळे आकाशने संतोषचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. मित्रांना बोलावून त्याने संतोषचा भोसकून खून केला.

खून केल्यानंतर ते दुचाकीवरून कोल्हापूर रस्त्याकडे पळून गेेले होते. आदिसागर मंगल कार्यालयाजवळ ते झुडूपात लपून बसल्याची माहिती पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार, हवालदार संदीप पाटील व संकेत मगदूम यांच्या पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकून पाचही संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून पळून जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

Back to top button