धुळ्यात 1 जुलैपासून प्लास्टिकबंदी | पुढारी

धुळ्यात 1 जुलैपासून प्लास्टिकबंदी

धुळे : पुढारी वृत्तसेवा
एकल वापर प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही. विघटन प्रक्रियेला काही वर्षांचा कालावधी लागतो. त्याचा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या एकल वापर प्लास्टिकच्या वापरावर 1 जुलैपासून शासनाने बंदी घातली आहे. या बंदीबाबत धुळ्याच्या नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय कृतिदलाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हास्तरीय कृतिदलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योतीकुमार बागूल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, शिरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, दैनंदिन जीवनात एकल वापर प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत. एवढेच नव्हे, तर प्लास्टिकच्या अतिवापरामुळे वन्यजीव, प्राणी, जलचरांवरही परिणाम होत आहेत. पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम थांबवून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. एकल वापर प्लास्टिकवर बंदी येणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून पर्यायी कापडी पिशव्या, कागदापासून बनविलेल्या पिशव्या वापरण्यास नागरिकांना प्रवृत्त करावे, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी जैविक कचर्‍याची विल्हेवाट, घनकचर्‍याचे व्यवस्थापन याचाही आढावा घेतला. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाखले यांनी एकल प्लास्टिक वापर व प्रतिबंधाविषयी सविस्तर माहिती दिली.

या साहित्याचा आहे समावेश
नागरिकांनीही एकल वापर प्लास्टिकचा वापर थांबवत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढे सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकोल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक काड्यांचा वापर असलेले कान कोरणे, प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅण्डी, आइस्क्रीम कांड्या, प्लास्टिक प्लेटस, कप, ग्लासेस आदी साहित्याचाही समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button