नाशिक : ‘ट्रॅफिक माइल’ संकल्पनेतून रस्त्यांचे होणार ‘मार्किंग’ ; पोलिस आयुक्तांनी मांडली संकल्पना | पुढारी

नाशिक : ‘ट्रॅफिक माइल’ संकल्पनेतून रस्त्यांचे होणार ‘मार्किंग’ ; पोलिस आयुक्तांनी मांडली संकल्पना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक सुरक्षा, वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व वाहनचालकांच्या सोयीसाठी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे प्रत्येक 100 मीटर अंतरावर मार्किंग करण्याची संकल्पना पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शासकीय यंत्रणासमोर मांडली. पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी (आरटीओ) सहभागी झाले होते.

पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले की, शहरातील 2,200 किलोमीटर रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाईल. यामध्ये रस्ता सुरक्षेसह स्मार्ट होणार्‍या शहरातील रस्त्यांवर प्रत्येक 100 मीटरवर ई-मॅपिंगसह यंत्रणेला जोडण्याचा मानस आहे. त्यास पोलिस मदत देण्यास तयार असून, महापालिकेने त्यास सकारात्मकता दर्शविली आहे. तर रस्त्यांचे नियोजन, नियमावलीसाठी आरटीओने पुढाकार घेतला आहे.

ही संकल्पना अमलात आणल्यास शहरातील पार्किंगच नव्हे, तर वाहतूक सुरक्षेचा प्रश्न मार्गी निघेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्राधान्य देण्याचा प्रयत्न चारही यंत्रणांनी दर्शविला आहे. रस्त्यांची मोजणी करण्यासाठी सीबीएस हे झीरो माइल केंद्र असेल. तेथून प्रत्येक 100 मीटर अंतरावर निशाण केले जाईल. त्यास स्वतंत्र क्रमांक असेल. प्रत्येक मार्गावर आवश्यकतेनुसार दिशादर्शक, नो पार्किंगचे फलक, सिग्नल यंत्रणा, झेब—ा क्रॉसिंग, सीसीटीव्ही यंत्रणा असेल. शहरातील सर्व रस्ते ‘गुगल लोकेशन’ला जोडण्यात येतील. चारही यंत्रणा मिळून ’कंट्रोल रूम’ असेल.

अ‍ॅपद्वारे त्वरित मदत
अ‍ॅपद्वारे अथवा क्रमांकाद्वारे मदत मागितल्यास संबंधित यंत्रणेला कळवून त्वरित मदत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. उपनगरांतल्या रस्त्यांना क्रमांक दिला जाणार. यानुसार रस्ते व 100 मीटरचे निशाण ओळखले जाईल. मोठ्या शहरांना जोडणारे प्रमुख सहा रस्ते नाशिकमधून जातात. या रस्त्यांना स्वतंत्र रंग दिला जाईल. जेणेकरून रंगाच्या मदतीवरून चालक इच्छित स्थळी योग्य मार्गाने जातील. त्यामुळे भविष्यात वाहतूक यंत्रणेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button