

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी 700 ते 800 रुपये क्विंटलच्या आसपास रेंगाळले आहेत. या दरांमुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. नाफेडतर्फे राज्यात सव्वादोन लाख टन कांदा खरेदी सुरू असली, तरी त्यामुळे कांदादरात किंचितही वाढ झालेली नाही. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी निष्प्रभ झाल्याचे मानले जात आहे.
या हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड दोन लाख 11 हजार हेक्टरवर झाली आहे. मात्र, यावर्षी हिवाळा लवकर संपल्यामुळे उशिरा लागवड केलेल्या कांद्याचे पोषण झाले नसल्यामुळे कांद्याची उत्पादकता घटली आहे. त्यातच एप्रिलमध्येही रांगडा कांदा बाजारात विक्रीस येत असल्याने उन्हाळ कांद्याला चांगले दर मिळू शकलेले नाहीत. त्यातच कांदा साठवणुकीची सुविधा नसलेल्या तसेच साठवण क्षमतेपेक्षा अधिक असलेला कांदा शेतकर्यांनी मेमध्ये बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणला. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढून दर तळाला गेले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या मुख्य आवारात व उपबाजारात मिळून रोज सरासरी सव्वा लाख क्विंटल आवक होत आहे. नाफेडचे खरेदीचे उद्दिष्ट बघता, कांदादर मेमध्ये वाढतील, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. प्रत्यक्षात तेथेही निराशा झालेली दिसत आहे.
अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट
उन्हाळ्यात शेतकर्यांचा कांदा मातीमोल दराने विकला जातो व ऑक्टोबरमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडतात. या दोन्ही बाबी टाळण्यासाठी, बाजारव्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठी नाफेडतर्फे सरकार उन्हाळ्यात कांदा खरेदी करीत असते. यावर्षी नाफेडने अडीच लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यातील सर्वाधिक सव्वादोन लाख टन खरेदी महाराष्ट्रातून केली जाणार आहे. सध्या नाफेडच्या प्रतिनिधींकडून खरेदी सुरू असली, तरी त्यामुळे कांद्याचे दर वाढण्यास काहीही मदत होत असल्याचे दिसत नाही.