धुळ्याच्या दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले ; मुलानेच आई व आजीचा खून केल्याचे स्पष्ट | पुढारी

धुळ्याच्या दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले ; मुलानेच आई व आजीचा खून केल्याचे स्पष्ट

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील तरवाडे शिवारात हॉटेल चालवणाऱ्या वृद्धेसह तिच्या मुलीची हत्या करणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. चारित्र्याच्या संशयावरून सख्ख्या आईच्या आणि आजीच्या डोक्यात 19 वर्षीय युवकाने पाईप टाकून खून केल्याची बाब पुढे आली आहे. या गुन्ह्याची उकल केल्याने तपास पथकाचे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी कौतुक केले आहे.

धुळे सोलापूर महामार्गावर तरवाडे शिवारात अल्पोपहाराची हॉटेल चालवणारी चंद्रभागाबाई भावराव माळी (वय 65) आणि तिची मुलगी वंदना गुणवंत महाले (वय 45) यांचा मृतदेह परवा आढळून आला होता. या दोघांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याने तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गेल्या 36 तासांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी समांतर तपास सुरू केला होता. यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासात ही हत्या वंदनाबाई महाले यांचा मुलगा हितेश महाले यांनी केल्याचे निदर्शनास आले. मयत वंदनाबाई महाले या जळगाव जिल्ह्यातील आडगाव येथे राहत होते. मात्र त्यांच्या परिवारात विविध कारणामुळे कौटुंबिक कलह असल्याचे तपासात निदर्शनास आले.

या महिलेच्या चारित्र्य संदर्भात पती गुणवंत आणि मुलगा दिनेश व हितेश यांना संशय असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत असल्याचे तपासात पुढे आले. या कारणामुळेच वंदनाबाई ही गेल्या तीन महिन्यापासून माहेरी तरवाडे येथे आई चंद्रभागाबाई यांच्यासोबत राहत होते. यादरम्यान वंदनाबाई यांना त्यांच्या पती आणि मुलांनी मध्यस्थच्या माध्यमातून सासरी परत नेण्याचे प्रयत्न केले मात्र मयत चंद्रभागाबाई ही मुलगी वंदनाबाई हिला सासरी पाठवण्यास संमती देत नव्हते. या सर्व बाबी तपासात पुढे आल्याने त्या आधारित तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यात हा वंदनाबाईचा लहान मुलगा हितेश गुणवंत महाले यांनी हे हत्याकांड केल्याचा संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.

विशेष म्हणजे त्याने आईच्या चारित्र्याचा संशय आणि वर्तणुकीतून संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले होते. त्यामुळेच आपण दुचाकीवरून तरवाडे येथे आलो. यानंतर लोखंडी पाइपने चंद्रभागाबाई आणि वंदनाबाई यांच्या डोक्यात वार करून त्यांना ठार मारण्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून हत्या करण्यासाठी वापरलेल्या पाईप वाटेत फेकून दिल्याची माहिती दिली. पाईपचा शोध पोलीस पथक घेत आहेत.

हेही वाचा :

Back to top button