नाशिक : ‘स्टाइस’ला पंचतारांकित मानांकनासाठी प्रयत्नशील | पुढारी

नाशिक : ‘स्टाइस’ला पंचतारांकित मानांकनासाठी प्रयत्नशील

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहत स्थापन करून जसे पंचतारांकित काम केले, त्याचप्रमाणे सहकारामध्ये पंचतारांकित मानांकन सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीला (स्टाइस) मिळवून देण्यास आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे संस्थापक माजी आमदार सूर्यभान गडाख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणी कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर औद्योगिक वसाहतीच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे – गडाख, उपाध्यक्ष नारायण पाटील, स्टाइसचे माजी चेअरमन दिलीपराव शिंदे, पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष पंडित लोंढे, मीनाक्षी दळवी, अविनाश तांबे, किशोर देशमुख, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदींसह माजी संचालक उपस्थित होते. सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीचे कार्य कौतुकास्पद आहे. कमी कालावधीत प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून अनेक कामे झाली आहेत. कामगार व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय मंडळाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असेही आमदार कोकाटे म्हणाले. नगरोत्थान विकास योजनेअंतर्गत औद्योगिक वसाहतीच्या परिसरात येणार्‍या नगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामासाठीदेखील निधी उपलब्ध करून दिला जाईल. हे रस्ते औद्योगिक वसाहतीसाठीही उपयोगात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी संचालक सुनील कुंदे, रामदास दराडे, शिवाजी आवारे, बाबासाहेब दळवी, नितीन नाकोड, जालिंदर शेळके, विलास मोगल आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. कोकाटे यांचे सहकार्य मोलाचे : माळोदे
प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे-गडाख यांनी प्रास्ताविकात आमदार कोकाटे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्योजकांचे व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी. त्याचप्रमाणे इंडियाबुल्सकडून अतिरिक्त जमीन मिळवून देण्यासाठी आमदार प्रयत्न करावे, अशीही मागणी केली.

‘स्टाइसला अतिरिक्त भूखंड मिळवून देणार’
औद्योगिक वसाहतीसाठी इंडिया बुल्सकडून अतिरिक्त भूखंड मिळवून देण्यास आपण प्रयत्नशील आहोत. शिर्डी संस्थानच्या जागेला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासोबत बैठकीचे लवकरच नियोजन करून पर्यायी जागेचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा:

Back to top button