नाशिक : चार टक्के नागरिक पहिल्या डोसपासून दूरच | पुढारी

नाशिक : चार टक्के नागरिक पहिल्या डोसपासून दूरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी असला तरी नागरिकांनी लसीकरणाचे डोस घेण्याबाबत मनपा प्रशासनाने पुन्हा एकदा आवाहन केले आहे. दरम्यान, शहरातील चार टक्के नागरिकांनी अजूनही पहिला डोस घेतलेला नसल्याची बाब समोर आली असून, अशा नागरिकांनी तत्काळ डोस घेण्याचे मनपाने कळविले आहे.

मनपाच्या लसीकरण केंद्रावर 16 जानेवारी 2021 ला कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. शहरातील 18 वर्षावरील एकूण लाभार्थ्यांपैकी 96 टक्के नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 77 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस देऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. शहरात मनपाचे 4 रुग्णालय व 30 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र असून, प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. दरम्यान, अपेक्षित लाभार्थ्यांपैकी 4 टक्के शहरातील लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत लशीचा पहिला डोस घेतलेला नाही. अशा लाभार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या नागरिकांचे कोव्हॅक्सिन लस घेऊन 28 दिवस पूर्ण झाले असतील तर त्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.

कॉर्बेव्हॅक्स लस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोस घ्यावा, तसेच फ्रंटलाइन वर्कर, हेल्थ केअर वर्कर आणि 60 वर्ष व त्यापुढील लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असल्यास अशा लाभार्थ्यांनी मनपाच्या लसीकरण केंद्रावर जाऊन बूस्टर डोस घ्यावा. फ्रंटलाइन वर्कर तसेच 18 ते 59 वयोगटातील लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यास खासगी लसीकरण केंद्रावर शुल्क देऊन आपले बूस्टर डोसचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त रमेश पवार व सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे केले आहे.

हेही वाचा :

Back to top button