धुळ्यात चोरीच्या ट्रक विक्रीचा काळाबाजार ; दोन एजंटला अटक, 12 ट्रक जप्त | पुढारी

धुळ्यात चोरीच्या ट्रक विक्रीचा काळाबाजार ; दोन एजंटला अटक, 12 ट्रक जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा

ट्रकच्या चेसीज आणि इंजिन नंबर मध्ये फेरफार करून बनावट नंबरच्या आधारावर ट्रकची विक्री करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी गजाआड केली आहे. या कारवाईत प्रथमदर्शी एक कोटी ४४ लाख रुपये किमतीच्या १२ ट्रक जप्त करण्यात आल्या असून राज्यभरात आणखी २७ ट्रकची अशाच पद्धतीने विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याप्रकरणी पोलिस पथकाने दोघा एजंटला अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातून देश पातळीवर वाहन चोरी करणारी टोळी उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

धुळे शहरामध्ये चोरीच्या ट्रक विक्रीचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.  त्यानुसार, चाळीसगाव रोड परिसरामध्ये ट्रान्सपोर्ट कमिशन एजंट शेख साजिद शेख अब्दुल यांच्या घरासमोर जिजे ०८ ए यू ७६९८ आणि एम एच ३८ एक्स २६०२ तसेच देवपुरातील कानुश्री मंगल कार्यालयाच्या मोकळ्या जागेत ८ ट्रक उभ्या असून या सर्व गाड्यांच्या इंजिन व चेसीज नंबर मध्ये फेरफार केल्याचे समजले. त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर तातडीने हालचाली करीत १२ ट्रक सह शेख साजिद शेख अब्दुल व इफतेखार अहमद अब्दुल जब्बार शेख उर्फ पापा एजंट या दोघांना ताब्यात घेतले.

या दोघांकडून ताब्यात घेतलेली कागदपत्रे तपासली असता बनावट नंबर व कागदपत्रे तयार करून या ट्रकची विक्री केल्याची बाब पुढे आली. यासंदर्भात आरटीओ कार्यालयाने पाठवलेल्या अहवालात १० ट्रक अशा पद्धतीने विक्री केल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस तपासात वेगवेगळ्या जिल्ह्यात आणखी २७ ट्रक अशाच पद्धतीने विक्री केल्याची बाब पुढे आली आहे. या कारवाईनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरटीओ यांना पत्र लिहून माहिती मागविण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्यात अशा प्रकारचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button