नाशिक : पाण्यासाठी आदिवासी महिलांचा नळवाडी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा | पुढारी

नाशिक : पाण्यासाठी आदिवासी महिलांचा नळवाडी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील नळवाडी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या जूनुने वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी बुधवारी (दि.18) सकाळी नऊच्या सुमारास ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला.

या गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र वीज कनेक्शन अभावी योजना कार्यान्वित झालेली नाही. वीज पुरवठ्यासाठीचे पोल उभारणीत काही शेतकऱ्यांनी अडथळा आणल्याचे समजते. त्यामुळे वीज कनेक्शनचे काम पूर्णत्वास जात नसल्याने योजना रखडली आहे. जूनुने वस्तीचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या वस्तीची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. राष्ट्रीय पेयजल योजना तातडीने पूर्ण करून आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

महिलांचा जमाव ग्रामपंचायतमध्ये दोन तास तळ ठोकून होता. ग्रामसेविका जयश्री हासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी योजना सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विज कनेक्शन व पोल उभारणीत अडथळा आणणार्‍या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीत बोलावून समजही देण्यात आली आहे. ग्रामपंचायतने ग्रामसभेवर देखील विषय मांडला. पोलिसात अर्जही दाखल केला. मात्र अद्याप तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

नळवाडीचे माजी सरपंच देवराम पुंजा माळी व विद्यमान उपसरपंच सुरेश माळी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भगिनींनी हा हंडा मोर्चा काढला. तथापि शुक्रवारी (दि. 20) योजनेशी संबंधित शासकीय अधिकारी, ठेकेदार यांना नळवाडीत पाचारण करण्यात आले असून त्यावेळी योजनेचा आढावा व योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने मोर्चेकरयांना दिले. त्यानंतर महिला मोर्चेकऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष दराडे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button