मिरज : छत्रपती शिवाजी रस्त्याची रूंदी झाली कमी | पुढारी

मिरज : छत्रपती शिवाजी रस्त्याची रूंदी झाली कमी

मिरज : जालिंदर हुलवान

शहरातील प्रमुख मार्ग असणार्‍या छत्रपती शिवाजी रस्त्याचे रूंदीकरण आता 22 मीटर ऐवजी 15 मीटर होणार आहे. म्हणजे 7 मीटर कमी रूंदीने रस्ता केला जाणार आहे. हे काम विविध अडणचींमुळे संथगतीने सुरू झाले आहे.

मिरजेला बायपास रस्ते नाहीत. शहरातील रस्ते तुडवितच सर्व प्रकारची वाहतूक होत असते. शहरातील काही प्रमुख रस्त्यांपैकी छत्रपती शिवाजी रस्ता हा एक आहे. कर्नाटक, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीकडे जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूकही जात असते. त्या अवजड वाहनांना या रस्त्यावरून जाण्यास बंदी आहे, अशी वाहनेही या रस्त्यावरून जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नेहमी होते. अपघातही नेहमी होतात. त्यामुळे महापालिकेने या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम 2011 मध्ये हाती घेतले होते. अत्यंत संथगतीने या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू होते. आजही काही ठिकाणी हा रस्ता रूंद करण्याचे बाकी आहे.

हा रस्ता दिल्लीतील राजपथ प्रमाणे करण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी पुढाकार घेतला आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला. शास्त्री चौक ते मेडीकल कॉलेज जवळील नाक्यापर्यंत हा रस्ता ट्रीमिक्स पद्धतीने करण्याची नियोजन करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथॉरिटीने सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या रस्त्याच्या खालून पाईपलाईन गेल्या असल्याने हा रस्ता ट्रीमिक्स पद्धतीचा करू नये, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे या रस्त्यासाठी नव्याने मंजुरी घेऊन 25 कोटी रुपये निधी देण्यात आला. कर्‍हाडमध्ये या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाला. ऑक्टोबर महिन्यात या रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होणार होते. परंतु काम सुरू झाले नाही. त्यानंतर मार्च महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र काम बंद पडले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बीबीएमपर्यंत काम होऊ शकते. अन्यथा पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करणे मुश्किल होणार आहे.

हा रस्ता एकूण 22 मीटर रूंदीचा व 11 किलो मीटर लांबीचा होणार आहे. मात्र आता राष्ट्रीय महामार्गाने 15 मीटर रस्ता करण्यास मंजुरी दिली आहे. 7 मीटरचे दोन्ही बाजूला डांबरीकरण व मध्ये 1 मीटर खांबांसाठी जागा सोडून हे काम काम करावे लागणार
आहे.

संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र हे काम केव्हाही थांबेल, अशा अडचणी आजही येथे निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी दूर झाल्या तरच हे काम पूर्ण होणार आहे.

रस्ता करताना येणार्‍या अडचणींची कारणे

या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे. रस्त्याखालून पाणी पाईपलाईन गेली आहे. काही ठिकाणी वीज पोल आहेत. खालील ड्रेनेज लाईनचे शिफ्टिंग करणे गरजेचे आहे. गॅस पाईपलाईन शिफ्टिंग व टेलिफोन केबल शिफ्टिंग होणे गरजेचे आहे. या अडचणी दूर न झाल्यास हे काम पूर्ण होणे अशक्य आहे.

Back to top button