धुळे : जागेच्या वादातून दहीवेलला तरुणाचा खून, आधी हत्याराने वार नंतर आवळला गळा | पुढारी

धुळे : जागेच्या वादातून दहीवेलला तरुणाचा खून, आधी हत्याराने वार नंतर आवळला गळा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तरुणाच्या डोक्यावर घातक हत्याराने वार करून तसेच गळफास देऊन त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा खून जागेच्या वादातून झाल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणात साक्री तालुक्यातील दहिवेल येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील दहिवेल येथे राहणारे रावसाहेब काशिनाथ पाटील (वय ३१) यांना गंभीर जखमी अवस्थेत दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर हत्याराने वार केल्याचे तसेच त्यांचा गळा आवडल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे मयताची मुंबई येथे राहणारी बहीण सुलोचना सुदाम पाटील यांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीत दहिवेल येथे राहणारे धनराज वंजी माळी आणि त्यांचा मुलगा सचिन धनराज माळी या दोघांचे रावसाहेब काशिनाथ पाटील यांच्यासमवेत जागेवरून वाद होते. या वादातून माळी बाप-लेकांनी दहिवेल येथे त्यांचे घराचे बांधकाम चालू असलेल्या तळघरात रावसाहेब पाटील यांचा गळा आवळून तसेच त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाण करून त्यांना गंभीर दुखापती केले.

या घटनेचा आपल्यावर संशय येऊ नये यासाठी माळी यांनी रावसाहेब पाटील यांना प्रथम दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्याचे तक्रारीत नमूद केले. मात्र भावाचा खून हा धनराज माळी व सचिन माळी यांनीच केल्याचे तक्रारीत नमूद केल्याने त्यांच्याविरोधात भादवि कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button