नाशिक : तीन महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले, चाइल्डलाइनचे यश - पुढारी

नाशिक : तीन महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले, चाइल्डलाइनचे यश

नाशिक : गायत्री पोरजे
मुलींचे शिक्षण, त्यांचे अधिकार आणि सुरक्षेच्या दृष्टीने सरकारी पातळीवर विविध योजना असल्या तरी समाजातील अनेक घटकांत शिक्षणाचा अभाव असल्याने तसेच अज्ञानातून मुलींचे बालवयातच विवाह लावून देत त्यांच्यावर संसाराचे ओझे लादण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे प्रकार चाइल्डलाइन हेल्पलाइनकडे आलेल्या तक्रारीवरून समोर आले आहेत. जानेवारी ते मार्च 2022 या अवघ्या तीन महिन्यांत जिल्ह्यात 26 मुलींचे बालविवाह रोखण्यात चाइल्डलाइनला यश आले आहे. तर वर्षभरात 40 बालविवाह रोखले आहेत.

मुलगी ही कुटुंबाचा आधार असून, ती शिकली तरच कुटुंबाचा उद्धार होईल, या संकल्पनेतून मुलींना शिक्षण देऊन, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेषत: बालवयात मुलींचे लग्न झाले तर अवेळी कौटुंबिक जबाबदारी पडल्याने तिच्या मनावर होणारा परिणाम तसेच शरीराची हेळसांड टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी कडक कायदे आहेत. असे असले तरी अज्ञानातून अनेक ठिकाणी आई-वडील, नातेवाइकांकडून मुलींचे बालपणीच लग्न लावून दिले जाते.

चाइल्डलाइनचे कार्य
शासकीय यंत्रणेला माहिती देणे, कुटुंब व प्रशासनाच्या सामंजस्याने बालविवाह टाळणे. एमएसडब्ल्यू विद्यार्थी, आशा सेविका यांना योग्य प्रशिक्षण देऊन जनजागृती करणे. संभाव्य बालविवाहाविषयी माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाते.

बालविवाहाची कारणे अशी
मुलींना कुटुंबातील ओझे समजणे. मुलगी म्हणजे काचेचे भांडे अशी धारणा. कुटुंबातील आर्थिक अडचणी, पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असलेली असक्षम पार्श्वभूमी, कुटुंबात शिक्षणाचा अभाव, अज्ञान, वयात येणार्‍या मुलींबद्दल असलेली चिंता.

विशेष म्हणजे हे प्रकार केवळ ग्रामीणच नाही, तर शहरी भागातही होत आहेत. खासकरून कोरोना काळात खर्च वाचवण्यासाठी ग्रामीणसह शहरी भागातही अल्पवयीन मुलींचे विवाह झाल्याचे समोर आले आहे. तर अलीकडे फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवशी आठ बालविवाह थांबण्यात चाइल्डलाइनला यश आले होते. चाइल्डलाइनच्या माध्यमातून तीन महिन्यांत 26 बालविवाह रोखण्यात आल्याने या मुलींवर पडणारे अकाली संसाराचे ओझे थांबले आहे. चाइल्डलाइनकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी बालविवाहाच्या केवळ 30 टक्केच तक्रारींची नोंद होत असून, गाव स्थलांतरित कुटुंबांमध्ये तसेच वाड्या, वस्त्यांसारख्या आदिवासी भागांत बालविवाहांचे प्रमाण अधिक आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक, हरसूल या भागात सर्वाधिक बालविवाहाच्या नोंदी असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही बालविवाह होतात. वयात येणार्‍या मुलींची सुरक्षा आणि समाजात मुलींविषयक समाजविघातक घटना यामुळे पालकांच्या मनात धास्ती असते. ज्यामुळे बालविवाहास अनेक जण प्राधान्य देतात.
– प्रणिता तपकिरे,
शहर समन्वयक, चाइल्डलाइन, नाशिक

चाइल्डलाइनची मदत योग्यवेळी घेतल्यास होणारे बालविवाह थांबवणे शक्य आहे. यासाठी सुज्ञ नागरिकांनी पुढे आले पाहिजे. माहिती पुरवणार्‍या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते.
– प्रवीण आहेर,
जिल्हा समन्वयक, चाइल्डलाइन, नाशिक

तीन महिन्यात रोखलेले बालविवाह 

जानेवारी 2022 – 02

फेब्रुवारी 2022-13

मार्च 2022- 11

हेही वाचा :

Back to top button