‘पेसा’चा प्रभावी वापर झाला पाहिजे : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांचा शेतकऱ्यांशी संवाद | पुढारी

‘पेसा’चा प्रभावी वापर झाला पाहिजे : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांचा शेतकऱ्यांशी संवाद

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी क्षेत्रातील विकासासाठी पेसाचा प्रभावी वापर झाला पाहिजे. या क्षेत्रासाठी असलेला निधी योग्य पद्धतीने वापरला गेला, तरच खर्‍या अर्थाने या भागात प्रगती होऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकासमंत्री अर्जुन मुंडा यांनी केले. हतगड येथे आयोजित शेतकरी, शेतमजूर मेळाव्यात ते बोलत होते.

ना. मुंडा म्हणाले, केंद्र सरकारचे आदिवासी क्षेत्राच्या विकासाला प्रधान्य आहे. या भागातील योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या पाहिजे. आदिवासींसाठी असलेला निधी आजही आदिवासींपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही, हे वास्तव आहे. याबाबत केंद्र सरकारने कडक धोरण आवलंबले असून, पक्के घर, हरोघरी नळ, महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहेत. आदिवासी भागात शिक्षक, दवाखान्यात डॉक्टर व स्टाफ देण्याचे काम राज्याचे आहे. त्याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी पावरा वाद्य भेट देऊन, त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, प्रकल्प अधिकारी विकास मीना, आ. दिलीप बोरसे, अशोक उके, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण तसेच दीपक खैरनार, भरत गावित, रमेश थोरात, अनिल कुमार, सचिन आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, संदीप कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा :

Back to top button