नाशिक : कोरोनात ‘लाट’लेली रक्कम परत ; मनपाकडून खासगी हॉस्पिटलच्या बिलांची तपासणी | पुढारी

नाशिक : कोरोनात ‘लाट’लेली रक्कम परत ; मनपाकडून खासगी हॉस्पिटलच्या बिलांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीच्या जीवघेण्या काळात शहरातील काही खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून जादा बिलांची मोठ्या प्रमाणावर आकारणी केली होती. या प्रकारे बिलांच्या नावाखाली ही लाटलेली सहा कोटींची रक्कम महापालिकेच्या माध्यमातून रुग्णांना परत करण्यात आली आहे. यामुळे ऐन कोरोना काळात आर्थिक विंवचनेत सापडलेल्या अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागला आहे.

कोरोना महामारीची पहिली आणि दुसरी लाट नागरिकांसाठी घातक ठरली. त्यातही दुसर्‍या लाटेमुळे जवळपास प्रत्येक घराला आघात सहन करावा लाग ला. या काळात तर रुग्णांना ऑक्सिजनही मिळत नव्हता आणि बेडही उपलब्ध होऊ शकले नाहीत. यामुळे मिळेल तसे आणि मिळेल त्या ठिकाणी रुग्णांना उपचार घ्यावे लागले. त्यातही काही खासगी रुग्णालयांनी तर हे संकट पाहून संधीच साधत रुग्णांची अडवणूक केली. शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड हे महापालिकेसाठी तर 20 टक्के बेड हे त्या रुग्णालयासाठी राखीव ठेवण्यात आले होते. असे असताना काही रुग्णालय व्यवस्थापनाने 80 टक्के बेड उपलब्ध न करून देता 20 टक्के राखीव बेड दाखवून रुग्णांची जणू लूटच केली होती. त्याचबरोबर औषधे, इंजेक्शन्स, पीपीई किट तसेच बेड, ऑक्सिजन, आयसीयू या प्रकारच्या सेवा देताना अवाच्या सवा बिलांची रक्कम लावण्यात आली होती. बहुतांश रुग्णांकडून तर आठ ते दहा लाखांच्या पुढेच बिलाची आकारणी करण्यात आल्याने यासंदर्भात शासनाकडे आणि मनपा प्रशासनाकडेही मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

तक्रारींनुसार शासनाने त्या-त्या ठिकाणच्या प्राधिकरणास वादग्रस्त आणि तक्रारी असणार्‍या हॉस्पिटलमधील बिलांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या मदतीने लेखापरीक्षण विभागाने लेखा परीक्षकांच्या मदतीने शहरातील 178 रुग्णालयांमधील बिलांची तपासणी केली असता त्यात जवळपास सहा कोटींची रक्कम अधिक घेण्यात आल्याची बाब समोर आली.

26 हजार 670
बिलांची तपासणी
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत खासगी रुग्णालयांमधून 65 हजार 565 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यापैकी मनपाच्या लेखापरीक्षण विभागाने 65 हजार 565 रुग्णांच्या बिलांची तपासणी केली असता त्यात संबंधित रुग्णालयांनी सहा कोटींची रक्कम बिलांमध्ये जादा लावल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे त्या रुग्णालयांकडून ही रक्कम पुन्हा रुग्णांच्या हवाली करण्यात आली असून, एवढी मोठी रक्कम रुग्णांना परत मिळवून देणारी नाशिक महापालिका पहिली ठरली आहे. 65 हजार रुग्णांपैकी
38 हजार 795 इतक्या रुग्णांचा आरोग्य विमा असल्याने अशा बिलांची तपासणी करण्यात आली नाही.

कोरोना रुग्ण- 65,000

रुग्णांचा विमा-38,795

बिलांची तपासणी- 26,670

हेही वाचा :

Back to top button