ओवैसींवर कारवाई करा; नाहीतर स्वस्थ बसणार नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

ओवैसींवर कारवाई करा; नाहीतर स्वस्थ बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून, एमआयएम नेत्यांवर टीकेची झोड सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये हनुमान चालिसा म्हटल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यावर सरकार कारवाई करणार का? असा सवाल करत जर ओवैसींवर कारवाई झाली नाही, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

महाराष्ट्र आणि हिंदूंना खिजविण्याचा प्रयत्न होत असताना राज्य सरकार कोणतीही कारवाई करीत नाही. ओवैसी यांची ही कृती हिंदूच नाही तर देशभक्त मुस्लिमांनाही धक्का देणारी आहे. मात्र, रोज उठून मोठमोठ्या बाता मारणारे आता कुठे आहेत? त्यांनी ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

तुम्हालाही तेथेच गाडू; राऊत यांचा ओवैसींना इशारा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेले आव्हान असून, आपण स्वीकारले असल्याचे सांगितले. औरंगजेबाला याच मातीत गाडले होते हे विसरू नका, तुम्हालाही कधी तरी तेथेच गाडू, असा इशारा दिला.

वारंवार येऊन औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे ओवैसी बंधूंचे राजकारण दिसत आहे; पण औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकले आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधी तरी तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

तर भाजप आमदार नितेश राणे यांनी, फक्त दहा मिनिटे ओवैसीला आमच्या ताब्यात द्या; मग बघा काय होते ते! अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Back to top button