नाशिक : शहरातील भटक्या श्वानांची समस्या ; संनियंत्रण समिती गठीत करणार | पुढारी

नाशिक : शहरातील भटक्या श्वानांची समस्या ; संनियंत्रण समिती गठीत करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका हद्दीतील भटक्या श्वानांसह सर्वच प्राण्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने महापालिका संनियंत्रण समिती स्थापन करणार असून, आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीवर सेवाभावी संस्थांच्या दोन प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने संबंधित संस्थांकडून अर्ज मागविले आहेत.

प्रिव्हेंटेशन ऑफ क्रुएलिटी (कॅप्चर ऑफ अ‍ॅनिमल) 1969 व अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग्ज) नियमांतर्गत महापालिका हद्दीतील भटक्या श्वानांसह सर्व प्रकारच्या पशुंसाठी संनियंत्रण समिती स्थापन करणे शासनाने बंधनकारक केले आहे. महापालिका हद्दीतील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी अशा श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते.

तसेच इतर प्राण्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता संनियंत्रण समिती गठीत करणे गरजेचे आहे. त्यानुसार मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणार्‍या या समितीत अतिरिक्त आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख, महापालिकेतील पशुसंवर्धन अधिकारी तसेच शासकीय पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त हे पदसिध्द सदस्य असतील. समितीवर अशासकीय सदस्य म्हणून दोन सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी मनपा पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागविले आहेत. 20 मेपर्यंत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

अर्जदारासाठी नियमावली
समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी संबंधीत सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधीने प्राणी कल्याण कामांतर्गत सेवा करणे आवश्यक असून, संस्था शासकीय नोंदणीकृत असावी. संस्थेचा प्रतिनिधी असल्याचे ओळखपत्र किंवा आदेश असले पाहिजे. अर्जदारास अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती असणे आवश्यक असल्याचे मनपाने प्रसिध्द केलेल्या जाहीर प्रकटनात म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button