नाशिक: रखरखत्या उन्हात ते करताय पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय | पुढारी

नाशिक: रखरखत्या उन्हात ते करताय पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
येथील वनप्रस्थ फाउंडेशनने उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय व्हावी म्हणून वृक्षारोपणासोबत घरटे तयार करून धान्यदेखील उपलब्ध केले आहे. हे घरटे आई भवानी डोंगरावरील झाडांना लावण्यात आल्याने पक्ष्यांची गैरसोय दूर झाली आहे.

वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवकांनी सोनांबे गावाजवळील आई भवानी डोंगर येथे दररोज सकाळी दोन तास श्रमदान करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करतात. गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी 6000 हून अधिक वृक्षरोपे लावली असून, त्यापैकी 96 टक्क्यांहून अधिक वृक्षरोपे जिवंत आहेत. वृक्षारोपणची काळजी घेण्याबरोबरच या ठिकाणी पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून वनप्रस्थचे स्वयंसेवक दत्तात्रय बोराडे यांनी खास पिण्याच्या पाण्याचे घरटे तयार केले आहे. हे घरटे आई भवानी डोंगरावरील झाडांना लावण्यात आले. सोबतच पक्ष्यांना खाण्यासाठी धान्यदेखील ठेवण्यात आले आहे. वाढत्या उन्हाच्या दाहकतेमुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था केल्यामुळे या भागात पक्ष्यांची किलबिल वाढली असल्याचे दिसून येत आहे.

फाउंडेशनचे स्वयंसेवक दत्तात्रेय बोराडे, राजेंद्र क्षत्रिय, अभिजित देशमुख, अनिल जाधव, डॉ. महावीर खिवंसरा, सोपान बोडके, सुनील विशे, मनोज भंडारी, संदीप खर्डे, सचिन आडणे, संदीप आहेर, महेश बोराडे, राजू गवळी, बापू भुसे, गणेश तांबोळी, संतोष कमळू आदी दररोज वृक्षरोपांचे संगोपन व पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करत असतात.

श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन
येत्या पावसाळ्यात वृक्षारोपणाच्या पूर्वतयारीसाठी श्रमदान कार्य चालू आहे. पर्यावरण संवर्धन कार्याची आवड असलेल्या स्वयंसेवकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन वनप्रस्थ फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button