मनसे नेते बाळा नांदगावकर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भेटीला | पुढारी

मनसे नेते बाळा नांदगावकर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मशिदींवरील भोंग्यावरुन इशारा दिल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर मनसेच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांची भेट घेतली आहे. 4 मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्याविषयी दिलेल्या अल्टिमेटवर आक्रमक भुमिका घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

जवळपास 28 हजार मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी काल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यामध्ये ही माहीती देण्यात आली होती. या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे. काल त्यांनी पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त यांचीदेखील यासंबंधी भेट घेतली होती. आज सकाळी 10 वाजता गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी बाळा नांदगावकर गेले होते. या भेटीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईवर चर्चा झाल्याचे समजते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१०) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मनसेच्या कार्यकर्त्यांना दहशतवाद्यासारखे शोधत असल्याचे म्हटले आहे. आरोपीला शोधणे हे पोलिसांचे कामच आहे. पोलीस आपले काम करत आहे. ज्या मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.

 

हेही वाचा

Back to top button