धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत पाणी सोडावे - आ. कुणाल पाटील यांची मागणी | पुढारी

धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत पाणी सोडावे - आ. कुणाल पाटील यांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यासह शिंदखेडा तालुका अवर्षणप्रवण भागात मोडला जातो. उन्हाळ्यात विहीरींची पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावते. यावर्षी देखील पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतातील असंख्य विहीरी आटल्या आहेत. त्यामुळे पांझरा काठावरील गावांची पाण्याची वणवण थांबावी आणि पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदीत सोडावे अशी मागणी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.

पांझरेत पाणी सोडल्यास धुळे तालुक्यासह शिंदखेडा तालुक्यातील गावांना दिलासा मिळणार असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. धुळे तालुक्यासह जिल्हयात उन्हाळ्याची दाहकता तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे. उन्हामुळे भूजल पातळी खालावल्याने असंख्य विहीरींनी तळ गाठला. तर बहूतांश विहीरी आटल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी माता भगीनींना वणवण फिरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचे श्‍वाश्‍वत स्त्रोतही आटल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी टँकरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यातून पांझरा नदी वाहत जाते.  नदी किनारी असलेल्या नेर, अकलाड, मोराणे प्र. नेर, कुसूंबा, खेडे, कुंडाणे, वार, मोराणे प्र.ल., नकाणे, महिंदळे, वरखेडी, कुंडाणे, जापी, शिरडाणे प्रडा, मोहाडी, धमाणे, नगाव, न्याहळोद आदी गावांसह शिंदखेडा तालुक्यातील काही गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा उदभव नदी किनारी असून गेले अनेक महिन्यांपासून नदीत पाणी सोडले नसल्याने संबधित गावांच्या पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्या आहे.

या योजनांच्या विहीरींची पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी काठावरील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नदी काठावरील ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी पांझरा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अनेकवेळा याबाबत माझ्याकडे मागणी केली असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून पांझरा नदीत अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

 

हेही वाचा :

Back to top button