नाशिक : बांधकाम परवानग्या 1 जुलैपासून ऑनलाइन | पुढारी

नाशिक : बांधकाम परवानग्या 1 जुलैपासून ऑनलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या 1 जुलैपासून महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत बांधकाम परवानग्या ऑनलाइन पद्धतीनेच देण्यात येणार असून, ऑफलाइनसाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ न देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. बीपीएमस ऑनलाइन प्रणालीसंदर्भात आर्किटेक्ट तसेच विकासकांना महाआयटीच्या मदतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नव्या प्रणालीसंदर्भात वैराज कलादालनामध्ये एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. या प्रणालीचा वापर करूनच आर्किटेक्ट व इंजिनीअर्स असोसिएशनने करावा, असे आवाहन नगररचना विभागाने केले आहे. सध्या नगररचना विभागाकडून 300 चौ.मी. पर्यंतच्या बांधकाम परवानग्या ऑनलाइन पद्धतीने दिल्या जात आहेत.

1 जुलैपासून नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांचे काम ऑनलाइन केले जाणार. शासनाने 30 जूनपर्यंत बांधकाम परवानग्या ऑफलाइन देण्यास मुदतवाढ दिली. परंतु, आयुक्त रमेश पवार यांनी 300 चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानग्या ऑनलाइन, तर 300 चौ. मी.पेक्षा अधिक क्षेत्रावरील बांधकाम परवानग्या या ऑफलाइन केल्या आहेत. यासंदर्भात प्रशिक्षण वर्गात सॉफ्टवेअरच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. सॉफ्टवेअरमध्ये लॉगिंग आणि रजिस्ट्रेशन कसे करायचे, याच्या माहितीसह डाटा अपलोड करणे, ड्रॉइंग रन करणे, शुल्क भरणे यासह सविस्तर माहिती दिली. नगररचना विभागातर्फे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी आर्किटेक्ट आणि विकासकांनी प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन केले.

शासनाने लागू केलेल्या नवीन बांधकाम व विकास नियंत्रण नियमावलीबाबत बीपीएमएस या प्रणालीत अनेक तांत्रिक त्रुटी होत्या. यामुळे संबंधित प्रणाली पूर्णपणे काम करू शकत नव्हती. आता त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button