नाशिक : शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना मिळणार पथविक्रेता प्रमाणपत्र | पुढारी

नाशिक : शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना मिळणार पथविक्रेता प्रमाणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेकडे बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून पथविक्रेता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. केंद्र शासनाचे राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविण्यात येत असून, या धोरणांतर्गत नाशिक महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात आजमितीस 10 हजार 614 इतक्या हॉकर्सची नोंदणी झाली आहे.

तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सध्या 225 इतके हॉकर्स झोन अर्थात, फेरीवाला क्षेत्र आहेत. शहरात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या फेरीवाल्यांची नोंदणी होऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिळावी, यादृष्टीने हॉकर्स झोन उपयुक्त ठरत असून, या जागी व्यवसाय करणार्‍यांची महापालिकेने बायोमेट्रिक नोंदणी केलेली आहे. अशा नोंदणीकृत फेरीवाल्यांनाच फेरीवाला क्षेत्रात जागा देण्यात आली असून, अशा नोंदणीकृत फेरीवाल्यांना आपले पथविक्रेता प्रमाणपत्र महापालिकेच्या नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, सिडको आणि सातपूर या सहाही विभागीय कार्यालयांतून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन मनपाच्या संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांलगतच फेरीवाल्यांकडून गाड्या लावल्या जातात. तसेच दुकाने थाटली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोच शिवाय पार्किंगसाठीदेखील पुरेशी जागा मिळत नाही. यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भरच पडते. त्याशिवाय अनधिकृतपणे दुकाने लावणार्‍या पथविक्रेत्यांवर (फेरीवाले) मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. त्यामुळे या घटना घडू नये यादृष्टीने राष्ट्रीय फेरीवाला धोरण फेरीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.

.. तर प्रमाणपत्र होणार रद्द
मनपाच्या आवाहनानंतरही संबंधित फेरीवाल्यांनी प्रमाणपत्र प्राप्त करून न घेतल्यास अशा विक्रेत्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. यामुळे पथविक्रेता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी त्वरित संपर्क साधण्यास कळविण्यात आले आहे.

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले हॉकर्स झोन – 225

शहरातील फेरीवाले-10,614

हेही वाचा :

Back to top button