मविआ सरकारने राज्याचे वाटोळे केले : सदाभाऊ खोत | पुढारी

मविआ सरकारने राज्याचे वाटोळे केले : सदाभाऊ खोत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडी सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. या राज्यास आता पवारांपासून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली असून, राज्यातील सरकार सध्या बारामतीवरून चालते, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. खोत यांचे ‘जागर -शेतकर्‍यांचा आक्रोश महाराष्ट्राचा’ हे राज्यव्यापी अभियानासाठी नाशिक येथे आले असता त्यांनी रविवारी (दि. 8) माध्यमांशी संवाद साधला.

सदाभाऊ खोत म्हणाले, जागर शेतकर्‍याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियानातून आम्ही राज्यभरातील शेतकर्‍यांशी संपर्क साधत आहोत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. त्यातून आम्हाला शेतकर्‍यांच्या मनात राज्य सरकारविरोधात असलेला रोष दिसत आहे. या सरकारचा कोरोना काळ अद्याप संपला नसल्याची टीका करीत ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारी तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दरोडा लपवण्यासाठी ते रोज वेगवेगळे विषय काढत आहेत. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकर्‍याच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करणार, असे आश्वासन देण्यात आले होते.

सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले नाहीच. उलट ऐन रब्बी हंगामामध्ये शेतकर्‍यांची वीज तोडण्याचे काम या सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. अजित पवार यांनीही आमची सत्ता आल्यानंतर राज्यातील शेतकर्‍यांना मोफत वीज देऊ, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला आहे. शेतकर्‍यांना पीकविमा मिळाला नाही, तसेच नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार अद्याप दिलेले नाहीत, अशीही त्यांनी टीका केली.

हेही वाचा :

Back to top button