नाशिक : युवा उद्योजक कसे उभे राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : ना. नरहरी झिरवाळ | पुढारी

नाशिक : युवा उद्योजक कसे उभे राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : ना. नरहरी झिरवाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सुशिक्षित बेरोजगारांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देताना, युवा उद्योजक कसे उभे राहतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्र विकास परिषदेप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, व्हीपीटी संस्था असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील शाह आदी उपस्थित होते. ना. झिरवाळ म्हणाले की, स्किल डेव्हलपमेंटमुळे रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला हे खरे आहे. पण, आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आपल्या मनाला आवडेल, त्या क्षेत्रात काम करावे. आपल्या क्षेत्रात काम करताना किमान 8 ते 10 जणांसाठी रोजगार निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावा. अक्राळेत आदिवासी एमआयडीसीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. दिंडोरी तालुक्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून, शासनाच्या सवलतींमुळे येत्या काळात रिलायन्स, इंडियन ऑइल कंपन्या उभ्या राहणार आहेत. त्याचा फायदा जिल्ह्याला होईल, असा विश्वास ना. झिरवाळ यांनी व्यक्त केला.

उद्योग व व्हीपीटी संस्थांच्या अनुदानाप्रश्नी 20 एप्रिलनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोेग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडे बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. स्वप्नील शाह यांनी, व्हीपीटी संस्थांबाबत दर 2 वर्षांनी शासनाचे धोरण बदलत असून, नोंदणीसाठी
40 हजारांपासून ते लाखापर्यंत खर्च येत असल्याची व्यथा मांडली. शासनाने संस्थांबाबत एक धोरण निश्चित करावे. तसेच सीएसआर निधीचे काम द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

तुमची रक्कम फार कमी : झिरवाळ
ललित गांधी यांनी प्रास्ताविकात राज्यातील 6 हजार व्हीपीटी संस्थांचे 500 कोटी रुपये थकल्याचे सांगितले. त्यावर झिरवाळ यांनी, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत उंदीर मारण्यासाठी कोट्यवधींचा खर्च झाल्याचा आरोप केला होता. त्यापुढे तुमची रक्कम फार कमी आहे, असा टोला लगावला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

हेही वाचा:

Back to top button