चासकमानच्या पाण्याची निमोणेला हुलकावणी | पुढारी

चासकमानच्या पाण्याची निमोणेला हुलकावणी

निमोणे; पुढारी वृत्तसेवा : चासकमान धरण प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे टेल भागातील शेतकर्‍यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागल्याची माहिती साई उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली. चासकमानचे आवर्तन 22 डिसेंबरपासून सुरू आहे. मात्र, चालू आवर्तनात चासकमानचे पाणी टेल भागासाठी मृगजळ ठरले आहे. परिसरातील पाझर तलाव अक्षरशः कोरडे पडले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेल गुळण्या टाकत असल्याने ऊसशेतीचे भवितव्य धोक्यात आहे.

यंदा मुबलक पाऊस झाला. मात्र, साठवणक्षमताच मर्यादित असल्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीलाच सगळे पाणवठे कोरडे पडू लागले. टेल भागातील निमोणे, निर्वी, गुनाट, मोटेवाडी परिसरासाठी चासकमानचे पाणी हा एकमेव आशेचा किरण आहे. सद्य:स्थितीत धरणात जवळजवळ 60 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे तब्बल दोन महिने कालवा सुरू असतानाही हेड असो की टेल, कोणाचेही समाधान नाही. टेल भागातील शेती पाण्याअभावी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ऊस, कांदे, फळबागा, चारापिके अडचणीत आल आहे.

काही दिवसांत टेल भागात पाणी
दरम्यान, चासकमान धरण प्रशासनाशी संपर्क साधला असता धरणात मुबलक पाणी असून, पुढील काही दिवसांत टेल भागातील सगळे पाणवठे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जातील, असे सांगण्यात आले.

Back to top button