शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या : ना. भारती पवार यांचे आवाहन | पुढारी

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या : ना. भारती पवार यांचे आवाहन

सुरगाणा (जि. नाशिक) प्रतिनिधी :
देशभरातील विशेषता ग्रामीण भागातील महिला या पिण्याचे पाणी डोक्यावर हंडे ठेऊन आणत असल्याने याची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मंत्रालय निर्माण करून हर घर जल, हर घर नल ही योजना देशात राबविण्याचे ठरवले. या योजनेमुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगून केंद्र सरकारच्या गाव पाड्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तालुक्यातील ठाणगाव येथे केले.

सुरगाणा तालुक्यातील हस्ते, आंबोडे व ठाणगाव ग्रामपंचायत अंतर्गत २८ गावातील मंजूर केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.  केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त पुरस्कृत जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांचे भुमीपूजन ना. डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ना. पवार यांनी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून पाणीप्रश्न प्रथम सोडवायचा आहे. या योजनेद्वारे विहीर, पाण्याची टाकी, पाइपलाइन, नळ दिले जाणार असून सुरगाणा तालुक्यातील २८ गाव व पाड्यांसाठी एकुण २६ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. उज्वला गॅस योजना राबवून महिलांची गैरसोय दूर केली आहे. या भागात वनौषधी असल्याने वनधन केंद्राच्या माध्यमातून एक गट तयार करण्यास सांगितले. आंबोडे व खोकरविहिर या गावाजवळ असलेल्या प्रसिद्ध भिवतास धबधबा या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने पर्यटन विकास होण्यासाठी निधी मंजूर केला आहे.

लक्ष ठेवण्यासाठी टॉवर, दरीलगत संरक्षक कठडे बसवले जात असून एक कमिटी स्थापन केली जाणार असून या कमिटीने देखभाल करायची आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून पवार यांनी पाणी टंचाई व्यतिरिक्त रस्ते, आरोग्य, गरोदर माता इत्यादी बाबींचा आढावा घेतला.  केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क साधावा तसेच महिला बचत गटांसाठी जी मदत करता येईल ती करेल याचे आश्वासन भारती पवार यांनी दिले.

याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विकास मीना, तहसिलदार सचिन मुळीक, सभापती मनिषा महाले, भाजपचे पदाधिकारी एन. डी. गावित, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, महिला विकास आघाडी तालुकाध्यक्ष मिनाक्षी कुंवर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष व नगरसेवक सचिन महाले, विजय कानडे, रंजना लहरे, जानकीबाई देशमुख, गोपाळ धूम, सुनिल भोये, रुपेश शिरोडे, राजेंद्र निकुळे, आवजी पालवी, योगीराज पवार, जयप्रकाश महाले, जयवंत बागुल, राजेंद्र बागुल, वसंत घांगळे, उत्तम कडू आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

 

Back to top button