एलआयसी आयपीओला मिळाली बंपर ओपनिंग | पुढारी

एलआयसी आयपीओला मिळाली बंपर ओपनिंग

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) समभाग खरेदीसाठी गुंतवणूकदारांची बुधवारी अक्षरश: झुंबड उडाली. एलआयसीचा आयपीओ बुधवारी खुला झाला आणि पहिल्याच दिवशी पहिल्या दहा मिनिटांत गुंतवणूकदारांनी तब्बल 17 लाख शेअर्ससाठी बोली लावली.

एलआयसीच्या एका समभागाच्या खरेदीसाठी 902 रुपये ते 949 रुपये हा प्राईसबँड घोषित केला आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना या भागखरेदीवर 60 रुपये प्रतिसमभाग सवलत देणार आहे. अन्य किरकोळ गुंतवणूकदारांना 45 रुपये सवलत दिली जाणार आहे. आयपीओमध्ये एलआयसी कर्मचार्‍यांसाठी 10 टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 8 टक्के, एचएनआय गुंतवणूकदारांसाठी 2 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

पैकी एलआयसीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 16,20,78,067 शेअर राखीव ठेवले आहेत. त्यापैकी आज बाजार सुरू होताच अर्धा तासात गुंतवणूकदारांकडून 70,61,970 शेअरची मागणी नोंदवण्यात आली आहे. एका तासांत हा आकडा 12 टक्क्यांवर गेला आहे. एकूण राखीव शेअरपैकी 12 टक्के शेअरसाठी बोली लावण्यात आली आहे.

एलआयसीचा आयपीओ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. सौदी अरेबियाच्या सौदी अराम्को या कंपनीच्या आयपीओशीही एलआयसीची तुलना होत आहे. गतवर्षी पेटीएमचा आयपीओ 18,300 कोटी रुपयांचा होता, तो आतापर्यंत भारतीय भांडवल बाजारातील सर्वात मोठा आयपीओ मानला जात होता.

द़ृष्टिक्षेपात आयपीओ

4 मे    खुला झाला
9 मे    बंद होणार
12 मे  शेअर्स अलॉटमेंट
13 मे  रीफंड प्रक्रियेस सुरुवात
16 मे  डीमॅट खात्यात शेअर क्रेडिट होणार
17 मे  शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणार

* पहिल्या दिवशी 16.2 कोटी शेअर्सपैकी 10 कोटींवर बोली; 64 टक्के सबस्क्राईब
* पॉलिसीधारकांच्या कोट्यात दुप्पट प्रतिसाद, 10 टक्के कोटा असताना 1.90 पट बोली
* केंद्र सरकारला या आयपीओतून 21 हजार कोटी रुपये मिळण्याची आशा

Back to top button