नाशिक : गणेशवाडीतील दोन मजली इमारत जमीनदोस्त | पुढारी

नाशिक : गणेशवाडीतील दोन मजली इमारत जमीनदोस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण हटविण्यावरील निर्बंध उठल्यानंतरही मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून पंचवटीतील गणेशवाडी येथील एका अनधिकृत इमारतीवर कारवाई होत नसल्याने न्यायालयाने मनपा आयुक्तांनाच सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. यामुळे ही बाब गांभीर्याने घेत आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी पोलिसांची मदत घेत गेल्या सोमवारी गणेशवाडीतील शेरे मळ्यातील दोन मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला धारेवर धरत यापुढे अतिक्रमण विभागाकडून अशा प्रकारची दिरंगाई चालणार नसल्याचे बजावले आहे. मार्च 2020 पासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने विविध प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते. नागरिकांवरील कोरोनाचे संकट आणि त्यात कुणी बेघर होऊ नये, यादृष्टीने राज्य सरकारने सर्व महापालिकांना अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण हटवू नये, असे आदेश दिले होते. गेल्या दोन दीड ते दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांना एक प्रकारे सवलतच देण्यात आली होती. परंतु, 2021 अखेर दिवाळीनंतर कोरोनासंदर्भातील अनेक निर्बंध हटविण्यात येऊन व्यवहार पूर्ववत करण्यात आले. परंतु, त्यानंतरही नाशिक मनपाने शहरातील अनधिकृत बांधकाम काढणे तसेच अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही ठोस अशी कारवाई कुठे केली नाही.

नवनियुक्त आयुक्त पवार यांनी शहराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण याबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अतिक्रमण विभागाला जाग आली आणि काही ठिकाणी मोहीम हाती घेण्यात आली. उपआयुक्त करुणा डहाळे यांनी शहरातील काही भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवून कारवाई सुरू केली. मात्र, एका जुन्या प्रकरणांत वारंवार आदेश देऊनही कार्यवाही होत नसल्याने जिल्हा न्यायालयाने आपले म्हणणे मांडण्यासाठी आयुक्तांनाच दि. 6 मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.

जागामालकाच्या तक्रारीनुसार कारवाई
जुलै महिन्यामध्ये गणेशवाडीतील शेरे मळा परिसरात एक दुमजली इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आल्याची तक्रार संबंधित जागामालकाने मनपाकडे केली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणाच्या दृष्टीने जिल्हा दिवाणी न्यायालयाने कोर्ट कमिशन बसविले होते. या कमिशनची 20 एप्रिल रोजी सुनावणी झाल्यानंतर मनपा काय कारवाई करणार, अशी विचारणा केली होती. तसेच यासंदर्भात पुढील सुनावणीसाठी आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या आधीच मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने संबंधित इमारत हटविण्यात आल्याचे उपआयुक्त डहाळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button