नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकाच मंचावर 47 महिला कलावंतांनी 10 कला सादर करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निमित्त होते 'स्वरपालवी : सन्मान दशकलांचा' या आगळ्या संकल्पनेच्या कार्यक्रमाचे. प्रशांत जुन्नरे यांचे बाबाज् थिएटर्स व सुवर्णा क्षीरसागर यांचे स्वरांजली संगीत संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ मीना निकम यांनी गायलेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' या गीताने झाला. सुमुखी अथनी व त्यांच्या सहकार्यांनी कथक नृत्य सादर केले. रसिका नातू-देसाई यांच्या 'तरुण आहे रात्र अजुनी', भार्गवी कुलकर्णी यांच्या 'पिया तोसे नैना लागे ना' गीताला रसिकांनी दाद दिली.
सोनाली करंदीकर यांच्या शिष्यांनी नृत्याविष्कार केला. चिन्मयी जोशी-वैद्य यांनी संवादिनीवर 'गोरी गोरी पान' हे बालगीत सादर केले. सुवर्णा क्षीरसागर यांच्या 'एक प्यार का नगमा हैं' या गीताच्या व्हायोलिन वादनावर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सुनीता देशपांडे, ज्योती डोखळे यांनी सतारवादन, सानिका जोशी यांनी बासरीवादन केले, दीप्ती जोशी-कुलकर्णी यांच्या कथेचे पल्लवी कुलकर्णी यांनी अभिवाचन, भाग्यश्री गुजर यांनी काव्यवाचन, कृपा परदेशी यांनी सिंथेसायझर वादन, प्राजक्ता प्रभाकर व ईश्वरी कोरान्ने यांनी अभिनय, मोहिनी भुसे यांनी संबळवादन, दीपाली सुरळकर यांनी नृत्य आदी कलाही सादर झाल्या. रागेश्री धुमाळ, पूजा शुक्ल-पाठक, प्रिया वझे, राधिका रत्नपारखी-गायधनी, वैष्णवी भडकमकर, गौरी सारंग यांनी साथसंगत केली. सुनेत्रा मांडवगणे यांनी सूत्रसंचालन केले.
म्युरल, चित्रांनी वेधले लक्ष
रंगमंचावर अन्य कला सादर होत असताना, एका बाजूला म्युरल कलावंत शुभांगी बैरागी, तर दुसर्या बाजूला चित्रकार समृद्धी चिखलीकर यांनी कलाविष्कार सादर केला. पूजा बेलोकर यांनी प्रेक्षागृहाबाहेर साकारलेल्या रांगोळीनेही लक्ष वेधून घेतले होते.