सप्तशृंगगड : आमच्या पाण्याची गोष्ट, रहिवासी गडाला पाझर फुटण्याच्या प्रतीक्षेत

सप्तशृंगगड : आमच्या पाण्याची गोष्ट, रहिवासी गडाला पाझर फुटण्याच्या प्रतीक्षेत
Published on
Updated on

सप्तशृंगगड : तुषार बर्डे
महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर विविध राज्यांतून दररोज हजारो भाविक देवी दर्शन तसेच पर्यटनासाठी येतात. निसर्गसंपन्न आणि प्राचीन काळापासून 108 कुंडांचे गाव म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगगडावर केवळ प्रभावी उपाययोजना व नियोजनाअभावी ग्रामस्थांसह येणार्‍या भाविकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती जागी होऊन गडाला कधी पाझर फुटणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कळवण तालुक्यात सप्तशृंगी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेले सप्तशृंगगड गाव महाराष्ट्रात धार्मिकस्थळाबरोबरच हिल स्टेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे देशाच्या विविध भागांतून भाविक, पर्यटकांचा राबता असतो. असे असले तरी गावात पर्यटक आणि भाविकांच्या द़ृष्टीने पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर वाणवा दिसते. विशेषतः पिण्यासह वापराच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने ती प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे.

सप्तशृंगगड परिसर संपूर्ण डोंगर व वनराईने नटलेला परिसर असल्याने पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, साठवणुकीसाठी अपुरी व्यवस्था असल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी ग्रामपंचायत तसेच देवी संस्थानाकडून संयुक्त प्रयत्न होणे गरजेचे आहे. येथील सद्यस्थिती पाहता गावात चार दिवसांआड नळाला पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवणूक करावी लागते. ते अपुर्‍या प्रमाणात असल्याने इतर इतर दिवशी पाण्यासाठी वणवण करावी लागते. प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकांकडून स्थानिक स्तरावर पाण्याच्या वितरणाबाबत नियोजन होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही.

जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था दयनीय

गडावर 1998 साली पहिले जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले होते. या केंद्राची सध्या दयनीय अवस्था आहे. याठिकाणी झोपडपट्टीचे स्वरूप आले आहे. येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने केंद्राची सुरक्षा 'देवी भरोसे' असल्याचे चित्र आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी गडावर भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 75 लाख रुपये मंजूर केले होते. मात्र, भ—ष्टाचाराचे ग्रहण लागल्याने तीही योजना अर्ध्यावर राहिल्या आहेत. गडावर 2 लाख 50 हजार लिटर क्षमतेचे दोन जलकुभ व अंतर्गत पाइपलाइन होती. पण यात गैरप्रकार झाल्याने ही योजना बारगळली व अर्धवट स्थितीत हे जलकुंभ उभे आहेत. त्यामुळे 20 वर्षांपासून पाणीटंचाई ही नागरिकांच्या पाचवीला पुजलेली आहे. काही वर्षांपूर्वी झरखेड व चणकापूर धरणांतूनही पाणी आणण्यासाठी प्रयत्न झाले होते. पण पुढे काहीच होऊ शकले नाही.

योजनेसाठी निकृष्ट दर्जाची पाइपलाइन
भाविक, पर्यटकांचा विचार करून शासनाकडून येथील सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी मोठ्या प्रमाणात निधी पाण्यात गेला आहे. योजनेसाठी ग्रामसेवकाच्या हट्टापोटी टाकण्यात आलेली पाइपलाइन निकृष्ट दर्जाची निघाल्याने प्रभावी ठरत नाही. या छोट्या योजनेसाठी गावात 14 व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत.

तलावाची साठवण क्षमता घटली
गावापासून 5 कि. मी. अंतरावर गावासाठी भवानी तलाव बांधण्यात आलेला आहे. मात्र, यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तीन वर्षांपूर्वी तलावाची गळती थांबविण्यासाठी अडीच कोटींचा निधी खर्च करण्याचा घाट ग्रामपंचायतीने घातला. पण त्याचा उपयोग झालेला नाही. ना गळती थांबली, ना पाण्याची पातळी वाढली. विशेष म्हणजे याबाबत गावातील कोणीही राजकारणी बोलण्यास तयार नाही.

108 कुंडांचे पुनर्जीवन व्हावे
गडावर प्राचीन काळापासून 108 कुंड आहेत. तर गावाच्या चोहोबाजूंनी गंगा, जमुना, देवनळी, तांबुल तीर्थ, सूर्यकुंड, शिवालय तलाव, गणेश कुंड आदी 108 कुंड आहेत. पण या कुंडांचा शोध घेऊन याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत देवी संस्थान, ग्रामपंचायत किंवा पुरातत्व विभागाकडूनही प्रयत्न होताना दिसत नाहीत. येथील पाणीटंचाई टाळण्यासाठी या कुंडांना पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. विशेषतः ग्रामंपचायतीने याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.

महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यासाठी ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी पाइपलाइन टाकणे व योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. पाण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.
– अजय दुबे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

गडावर येणार्‍या भाविक, पर्यटकांना पाणी पुरवणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही पाणीपट्टी भरतो. धरणापासून ते गावात पाणी आणण्यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे.
– विवेक बेनके,
सामाजिक कार्यकर्ते, सप्तशृंगगड

योजनेसाठी निकृष्ट दर्जाची पाइपलाइन
भाविक, पर्यटकांचा विचार करून शासनाकडून येथील सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी मोठ्या प्रमाणात निधी पाण्यात गेला आहे. योजनेसाठी ग्रामसेवकाच्या हट्टापोटी टाकण्यात आलेली पाइपलाइन निकृष्ट दर्जाची निघाल्याने प्रभावी ठरत नाही. या छोट्या योजनेसाठी गावात 14 व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news