सरकारला उत्पन्न मिळवून देण्यात कर सल्लागारांचा वाटा : जीएसटी आयुक्त थेटे | पुढारी

सरकारला उत्पन्न मिळवून देण्यात कर सल्लागारांचा वाटा : जीएसटी आयुक्त थेटे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
विविध व्यापारी, उद्योजक, कारखानदार यासारख्या मोठ्या करदात्यांना सुयोग्य मार्गदर्शन करून सरकारला कर रूपाने उत्पन्न मिळवून देण्यामध्ये कर सल्लागार मध्यस्थ म्हणून मोठी भूमिका पार पाडतात, असे प्रतिपादन केंद्रीय जीएसटी आयुक्त अविनाश थेटे यांनी केले. राज्यस्तरीय कर सल्लागार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, कर कायदा क्षेत्रातील संघटनांनी मिळून नाशिक येथे घेतलेली राज्यस्तरीय कर सल्लागार परिषद सुमारे 12 वर्षांनंतर झाली आहे. परिषदेने खर्‍या अर्थाने ज्ञानाचा महाकुंभ खुला करून दिला आहे. विविध कर सल्लागार संघटनांनी एकत्र येत ही दोनदिवसीय कर सल्लागार परिषद आयोजित केली आहे. यावेळी अपर राज्य कर आयुक्त सुभाष येंगडे, एस. के. डी. कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय देवरे उपस्थित होते.
आयुक्त थेटे म्हणाले की, कायद्यांमध्ये होत असलेले बदल, नवीन नियम याबाबत सर्वप्रथम कर सल्लागारांना त्यांचे क्षेत्रातील ज्ञान अवगत करून घ्यावे लागते.

यावेळी नाशिककर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशचंद सुराणा यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. परिषदेसाठी राज्यभरातील सुमारे 250 करसल्लागार, सीए, त्याचप्रमाणे टॅक्स वकील उपस्थित होते. द्वितीय सत्रामध्ये प्रमोद शिंगटे तसेच सीए संजय मुथा यांनी आयकर कायद्यातील ‘फेसलेस असेसमेंट’ या नवीन तरतुदीबाबत माहिती दिली.

परिषदेच्या प्रथम सत्रात सीए विशाल पोद्दार, अ‍ॅड. दीपक बापट यांनी जीएसटी कायद्यातील नवनवीन तरतुदींबाबत माहिती दिली. याप्रसंगी मनोज चितळीकर, अलोक मेहता, एन. बी. मोरे, नरेंद्र सोनवणे, अनिल चव्हाण, अ‍ॅड. प्रकाशचंद सुराणा, संजय देवरे, प्रकाश विसपुते, पंकज पारक, अमोल माने, योगेश कातकाडे, नितीन डोंगरे आदी उपस्थित होते. सीए आदित्य क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा :

Back to top button