सिंहायन आत्मचरित्र : पत्रकारितेचा सन्मान | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : पत्रकारितेचा सन्मान

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

सन्मान, पुरस्कार किंवा सत्कार हे एक प्रकारे आपण आयुष्यभर दिलेल्या योगदानाची पोचपावतीच असते. माणूस एकवेळ उधारीचा व्यवहार करेलही, परंतु नियती कधी उधारी ठेवत नाही. ती नेहमीच रोखीचा व्यवहार करते. माणसानं जर चांगलं काम केलं, तर त्याची पोचपावती नियती लगेचच देऊन टाकते. मी आयुष्यभर प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्याची आणि झुंझार, निर्भीड, नि:पक्ष पत्रकारितेची नोंद कुणीतरी कुठेतरी ठेवत होतं. खरं तर, त्याची पोचपावती मला मिळणार आहे, हे कधी माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. किंबहुना तशी अपेक्षा मी कधी ठेवलीही नव्हती. परंतु, ध्यानीमनी नसतानाच ज्या सुखद घटना घडतात, त्याचा आनंद काय वर्णावा! त्याची गोडीही अवीट असते. माझ्या बाबतीतही अगदी असंच घडलं.

ती प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या होती. ‘पुढारी’चं कार्यालय नेहमीप्रमाणं कामकाजात गर्क होतं. संपादक विभागाची नित्याची घाईगडबड चाललेली होती. अन् अचानक प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेच्या टेलिप्रिंटरवर ‘पद्म’ पुरस्कारांची यादी प्रिंट व्हायला सुरुवात झाली आणि बातमीच्या पहिल्या पानावरच माझं नाव झळकलं! पी. जी. जाधव (महाराष्ट्र) अर्थात प्रतापसिंह जाधव! एका क्षणात ‘पुढारी’च्या कार्यालयात आनंदाची आणि उत्साहाची कारंजी थुई थुई नाचू लागली.

सिंहायन आत्मचरित्र
नवी दिल्लीत संसद भवनातील सोहळ्यात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते माझा राष्ट्रीय पातळीवरील पांचजन्य नचिकेता पुरस्काराने गौरव करण्यात आला. शेजारी तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी.

मला कुणीतरी धावत येऊन बातमीची प्रिंट दिली. ती मी वाचली. सळसळत्या विजेसारखी आनंदाची लहर संपूर्ण शरीरात फिरली. माझ्या इतक्या वर्षांच्या जनसेवेची भारत सरकारनं दिलेली ही पोचपावतीच होती. नियती आपल्यावरचं ऋण कधीच ठेवीत नाही; ती त्याची परतफेड करतेच, याची प्रचिती मला आली. हसतमुखानं मी या सन्मानाचं स्वागत केलं. ‘हा सन्मान माझ्या एकट्याचा नाही. तो मला अंगाखांद्यावर वाढवलेल्या आणि मला मोठं केलेल्या कोल्हापूरचाही आहे!’ अशा शब्दांत मी माझ्या भावना व्यक्त केल्या.

भारत सरकारनं माझ्या सर्वांगीण कार्याची दखल घेऊनच माझी ‘पद्मश्री’ या बहुमानासाठी निवड केली होती. माझं पत्रकारितेतील योगदान, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी आतापर्यंत केलेलं कार्य, सियाचीन हॉस्पिटलची उभारणी तसेच गुजरातमधील बच्छाव तालुक्यातही भूकंपग्रस्तांसाठी निर्माण केलेलं आणखी एक रुग्णालय या कार्याची नोंद घेतानाच इतरही अनेक राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याची दखल घेण्यात येऊनच मला या महत्त्वाच्या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं.

मला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर होताच, माझ्या अभिनंदनासाठी फोन खणखणू लागले. फोनची रिंग थांबायलाच तयार नव्हती. एकाशी बोलून रिसीव्हर क्रेडलवर ठेवला की, दुसरी रिंग वाटच बघत होती. तीच अवस्था भ्रमणध्वनीची. दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी एकाचवेळी वाजत होते आणि कुठला घ्यावा नि कुठला ठेवावा, तेच कळत नव्हतं. शेवटी एकावेळी एकाशीच बोलायचं असतं आणि ते मलाच बोलायचं होतं. दुसर्‍यानं बोलून चालणार नव्हतं.

त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करणार्‍यांची तरी रीघच लागली होती. कार्यालयात आणि घरातही पुष्पगुच्छ आणि पुष्पहारांचा ढीग पडला हेाता. अगदी मोजकीच नावं घ्यायची झाली, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, बाळासाहेब विखे-पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोनवरून माझे मनःपूर्वक अभिनंदन केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे संपादक दिलीप पाडगावकर, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी माझं दूरध्वनीवरून साभिमान अभिनंदन केलं.

कोल्हापूरकरांचा उत्साह तर काय वर्णावा! कोल्हापुरात ठिकठिकाणी माझ्या अभिनंदनाचे फलक झळकू लागले. पुढे कित्येक दिवस ‘पुढारी’तील गर्दी हटायलाच तयार नव्हती. ही अभिनंदनाची मांदियाळी अखंडपणे चालूच होती. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून तसेच गोवा, कर्नाटकातून आणि दिल्लीतून… इतकेच काय, तर परदेशातूनही माझ्या अभिनंदनाचे फोन, पत्रे आणि ई-मेल यांचा अक्षरशः वर्षावच झाला. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी माझे हार्दिक सत्कार झाले. विविध सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि विविध संघटनांच्या अभिनंदनाच्या ठरावांचा तर पाऊसच पडला.

सिंहायन आत्मचरित्र
पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने दीक्षांत सोहळ्यात
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लेटर्स या सन्मानाने माझा गौरव करण्यात आला. याप्रसंगी डावीकडून डॉ. डी. वाय. पाटील, कुलगुरू डॉ. पी. एन. राजदान, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. सोमनाथ पाटील.

खरं तर, 2003 साल हे माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय वर्ष ठरलं. यावर्षी माझ्यावर अनेक पुरस्कारांचा अक्षरशः वर्षावच झाला. विशेष म्हणजे हे सर्व पुरस्कार मला राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा उपपंतप्रधान यासारख्या महनीय व्यक्तींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘पद्म’ पुरस्कार हा देशातील अतिशय महत्त्वाचा आणि मानाचा सन्मान. या पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तीनं त्या-त्या कार्यात केलेली उत्तुंग कामगिरी लक्षात घेतली जाते. त्याची काटेकोर छाननी होते. ती कामगिरी अनेक निकषांवर घासून पाहिली जाते. मगच संबंधिताची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. 2003 हे वर्ष उगवलं, ते ‘पद्मश्री’ हा मानाचा किताब मला बहाल झाल्याच्या घोषणेनंच!

मला ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्यानं हा कोल्हापूरच्या सुपुत्राचाच सन्मान झाला होता. विशेष म्हणजे आबांचाही ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. यानिमित्तानं पित्यापाठोपाठ पुत्रालाही ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त होण्याचा दुर्मीळ योग जुळून आला होता. एकाच घरात, एकाच क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिता-पुत्रांना ‘पद्म’ पुरस्कार मिळण्याचा हा योग निदान पत्रकारितेच्या क्षेत्रात तरी दुर्मीळच म्हणावा लागेल.

त्यात ‘पुढारी’ हा कोल्हापूरचा श्वास. ‘पुढारी’ आणि ‘कोल्हापूर’ यांची पिढ्यान् पिढ्यांची नाळ जुळलेली आणि म्हणूनच मला मिळालेला पद्मश्री हा माझ्याबरोबरच कोल्हापूरकरांचाही बहुमान होता. त्यामुळेच समस्त कोल्हापूरकरांच्या आनंदाला भरतं आलं होतं. तो आनंद साजरा करायचं कोल्हापूरकरांनी ठरवलं. आता सार्वजनिकरीत्या एकत्र येऊन आनंदोत्सव करायचा, तर त्यासाठी ऐतिहासिक दसरा चौकासारखं दुसरं स्थळ आणखी कुठलं असणार होतं! मग याच ठिकाणी 25 फेब्रुवारी 2003 रोजी माझा भव्य नागरी सत्कार करण्याचं कोल्हापूरनं ठरवलं.

तत्कालीन महापौर दिलीप मगदूम आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब नवणे हे दोघे या सत्काराचे निमंत्रक होते. ते दोघे म्हणजे शहर आणि जिल्ह्याचे प्रतिनिधीच. प्रथम नागरिक. त्यामुळे त्यांच्या निमंत्रणाला फार मोठा अर्थ होता. त्याशिवाय माझ्या या सत्कार समारंभासाठी एक व्यापक जिल्हा नागरी सत्कार समिती स्थापन करण्यात आली होती. सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, तसेच सहकार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, कला, क्रीडा यासारख्या सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांचा या समितीत समावेश केला गेला होता.

25 फेब्रुवारी 2003 ही तारीख उजाडली आणि सारे शहरच स्वागत कमानींनी नटले. दसरा चौकात भव्य शामियाना आणि व्यासपीठ उभारण्यात आले होते. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते माझा हा नागरी सत्कार होणार होता, तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्याची जय्यत तयारी झाली होती.

ज्या दसरा चौकात शिलंगणाचं सोनं लुटलं जातं, त्याच दसरा चौकात विराट जनसागराच्या साक्षीनं माझा भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. सुशीलकुमार शिंदे हे माझे चाळीस वर्षांचे मित्र. खरं तर वर्गमित्रच. आपल्या मित्राचा सत्कार करताना त्यांच्या वाग्वैजयंतीला बहर आला होता.

सिंहायन आत्मचरित्र
हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात तत्कालीन राज्यपाल व कुलपती श्रीमती उर्मिला सिंग यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवीने मला सन्मानित करण्यात आले. त्यावेळी डावीकडून कुलगुरू प्रा. ए. डी. एन. वाजपेयी, तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी.

“बाळासाहेबांचा सत्कार हा सच्चा पत्रिकारितेचा सत्कार आहे. प्रबोधनाचा मार्ग दाखवणार्‍या प्रगल्भ पत्रकारितेचा आणि श्रेष्ठ कर्तृत्वाचा हा सन्मान आहे.” असं सांगून सुशीलकुमार शिंदे यांनी, “बाळासाहेबांच्या धगधगत्या पत्रकारितेचा ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरव झाला आहे,” असे भावोत्कट उद्गार काढले.

“आम्ही फक्त दोनच बाळासाहेबांना मानतो. एक हे बाळासाहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे!” असा उल्लेख गोपीनाथ मुंडे यांनी करताच शामियाना टाळ्यांच्या कडकडाटानं दणाणून गेला आणि त्याला व्यासपीठावरील नेत्यांनीही दाद दिली.

पक्षभेद आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी सत्कारासाठी एकत्र येण्याचं हे अलीकडच्या काळातील एकमेव उदाहरण. दोन दशकांपूर्वी आबांच्या अमृत महोत्सवासाठीही असेच सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यानंतरचा हा प्रसंग.

या नागरी सत्कारातून कोल्हापूरकरांच्या माझ्यावरील अलोट प्रेमाचा मला पुन्हा एकदा प्रत्यय आला. या समारंभाला लोकांनी एवर्ढी गर्दी केली की, दसरा चौकाकडे येणारे चारही रस्ते गर्दीनं अक्षरशः फुलून गेले. शामियाना अपुरा पडला. मागच्या लोकांना सोहळा जवळून पाहता यावा म्हणून ठिकठिकाणी स्क्रीन उभे करण्यात आले होते.

माझ्याबरोबरच अभिनेते आमीर खान आणि अन्य मान्यवरांनाही पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पुरस्कार प्रदान समारंभाला आम्ही सर्वच कुटुंबीय गेलो होतो. त्यासाठी शासनानं खास आमची विमान प्रवासाची व्यवस्था केली होती आणि दिल्लीमध्येही आलिशान अशा पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरण्याची सोय केली होती. या कार्यक्रमाचं सर्व नियोजन राष्ट्रपती भवनातील अधिकार्‍यांकडूनच होत असतं आणि ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात येतं.
3 एप्रिल 2003!
सकाळचे साडेअकरा वाजतात.

स्थळ : नवी दिल्ली, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल.

देशातील ‘क्रीम ऑफ सोसायटी’ या भव्य ऐतिहासिक हॉलमध्ये उपस्थित असते. लष्करी बँडवर ‘फन फेअर’चे सूर आळवले जात असतात. अशा या उत्फुल्ल वातावरणात, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं आगमन होतं. मग सुरू होतो, ‘पद्म’ पुरस्कार वितरणाचा शाही सोहळा. जोधपुरी कोट परिधान करून मी या शाही सोहळ्यात सहभागी झालेलो. आपापल्या कार्यक्षेत्रात भव्य कामगिरी केलेल्या 91 निवडक व्यक्तींचा हा गौरव समारंभ.

आणि मग प्रतापसिंह जाधव या नावाची घोषणा होते. मी प्रसन्न वदनानं राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारतो. टाळ्यांचा कडकडाट होतो. हा तर ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ पत्रकारितेचा सन्मान. सार्वजनिक क्षेत्रात निरपेक्षपणे केलेल्या कार्याचीच पोचपावती. पुरस्कार स्वीकारताना मला धन्य धन्य वाटलं. पंचगंगेचं पाणी यमुनेला मिळाल्याचा आनंद मनात उचंबळून आला. उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी अशा महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत झालेला आपल्या ‘बाळ’चा सत्कार पाहून स्वर्गात आबांचंही अंतःकरण भरून आलं असेल, यात शंकाच नाही. तो विचार मनात घर करून बसला आणि नेत्रकडा किंचित ओलावल्या!

‘पांचजन्य’ हे भगवान श्रीकृृष्णाच्या शंखाचं नाव. त्या पांचजन्याचा शंखनाद शत्रूच्या हृदयात धडकी भरवत असे. त्यांना गर्भगळीत करून सोडत असे. तसेच ‘नचिकेत’ म्हणजे साक्षात यमधर्मालाही जिंकणारा ऋषिपुत्र! या दोन्ही नावांचा सुरेख संगम ज्या पुरस्कारासाठी झाला आहे, असा प्रतिष्ठेचा पुरस्कार मला कधी मिळेल, असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. परंतु, जे अनपेक्षितपणे मिळतं, त्याचाच खरा आनंद उपभोगता येतो. माझ्याबाबतीत अनपेक्षित आणि सुखद धक्का देणारा प्रसंग म्हणजे ‘पांचजन्य नचिकेता’ या पुरस्काराचा मी मानकरी ठरलो, तो अविस्मरणीय क्षण होय! नचिकेता प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकारितेतील ‘पांचजन्य नचिकेता’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या भव्य पुरस्कारासाठी माझं नाव जाहीर करण्यात आलं, तेव्हा माझा माझ्यावरच विश्वास बसला नाही.

‘पुलित्झर’ हा पत्रकारितेतील योगदानाबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार आहे. अमेरिकेतील या पुरस्काराच्या तोडीचाच हा ‘पांचजन्य नचिकेता’ पुरस्कार समजला जातो. मी या पुरस्काराचा पाचवा मानकरी. या पुरस्कारानं माझी निस्सीम देशभक्ती आणि ध्येयवादी पत्रकारिता यावर राष्ट्रीय मान्यतेची मोहर उठवली, यात शंकाच नाही. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारा महाराष्ट्रातील मी एकमेव पत्रकार आहे.
10 मे 2003!
संसद भवनातील सभागृह.
नचिकेता प्रतिष्ठानच्या वतीनं ‘पांचजन्य नचिकेता’ हा पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते, शानदार सोहळ्यात आणि धीरोदात्त वातावरणात मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख दीड लाख रुपये असा हा पुरस्कार होता. पंतप्रधानांसमवेतच उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यासारख्या मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमास जातीनं उपस्थित होत्या.
यावेळी विद्यमान पत्रकारितेसंबंधी वाजपेयी यांनी मांडलेले विचार द्रष्टेपणाचे होते. ते म्हणाले, “मूल्यहीनतेचं वादळ घोंगावत आहे. अशा वेळी ध्येयवादी पत्रकारितेमुळेच भविष्यकाळ उज्ज्वल राहील.”
अशा प्रकारचा मननीय विचार मांडत असतानाच त्यांनी ‘पुढारी’च्या ध्येयवादी पत्रकारितेचाही गौरव केला.

मी माझ्या भाषणात “आमची राष्ट्रीयता आम्हीच वाचवू” अशी ग्वाही दिली आणि पुरस्काराची दीड लाखांची रक्कम सियाचीन हॉस्पिटलला देणगी म्हणून जाहीर केली. तेव्हा सभागृहानं टाळ्यांच्या प्रतिसादानं मला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमानंतरही उपस्थित मान्यवरांनी माझं मनःपूर्वक अभिनंदन केलं. शुभेच्छाही दिल्या. कोल्हापूरच्या सुपुत्रानं दिल्लीवर झेंडा लावल्याची भावना कोल्हापूरकरांनी व्यक्त केली. ‘पद्मश्री’ आणि ‘पांचजन्य’ या दोन्ही पुरस्कारांच्या निमित्तानं माझा राष्ट्रपती भवन आणि संसद अशा दोन्ही सर्वोच्च ठिकाणी सन्मान झाला.

‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी सन्मानाबरोबरच माझ्याकडे कितीतरी सन्मान आणि पुरस्कार चालत आले. कोल्हापूर महापालिकेनं मानपत्र देऊन माझा गौरव केला. कोल्हापूर महापालिकेचं मानपत्र मिळालेले माझे आबा हे पहिले मानकरी. पित्यापाठोपाठ पुत्राचाही गौरव होण्याचा कदाचित हा एकमेव प्रसंग असावा! तसेच मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘दर्पण’ पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. त्याही पुरस्काराचा मी मानकरी ठरलो. त्यापाठोपाठ मला ‘एकमत’ हा आणखी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

झाशी येथे ‘स्वामी विवेकानंद पीठ’ ही राष्ट्रीय संस्था आहे. सियाचीन हॉस्पिटलची उभारणी करून, राष्ट्रीय कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल, या पीठातर्फे मला ‘स्वामी विवेकानंद’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसेच ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनात सडेतोड भूमिका बजावून शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल अहिंसा प्रसारक ट्रस्टच्या वतीनं माझा दिल्लीतील लाल किल्ल्याच्या साक्षीनं हृद्य सत्कार करण्यात आला.

हिमाचल युनिव्हर्सिटीनं तर मला तत्कालीन निवडणूक आयुक्तांच्या हस्ते सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केली! आणि मग एक डॉक्टरेट पुरेशी नव्हती की काय; म्हणून पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठानंही मला आणखी एक डॉक्टरेट देऊन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते माझा सन्मान केला. आजपर्यंतच्या माझ्या समाजकार्याबद्दल आणि सियाचीनमध्ये बांधलेल्या हॉस्पिटलबद्दल दक्षिण महाराष्ट्रातील माजी सैनिकांनीही माझा गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली.

पुण्यातील सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रांत महनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात येतो. 2012 साली वृत्तपत्र क्षेत्र आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल मला ‘सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार मी स्वीकारला. ‘प्रसारमाध्यमांनी मनावर घेतलं, तर ती समाजकार्यही करू शकतात किंबहुना माध्यमांनी तेवढी सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे,’ हे मी सोदाहरण पटवून दिलं.

नागपुरातील महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे मला आदर्श संपादक म्हणून दै. देशोन्नती पुरस्कृत स्व. नानासाहेब वैराळे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपुरातील सायंटिफिक सभागृहातील एका शानदार सोहळ्यात अ. भा. साहित्य संमेलनाचे तत्कालीन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते मी हा पुरस्कार स्वीकारला. देवेंद्र फडणवीस, यशवंत पाध्ये, संपादक परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यासारखे मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. इचलकरंजी नगर पालिकेनंही मला मानपत्र देऊन माझा गौरव केला. या आधी इचलकरंजी नगर पालिकेने केवळ दोघा मान्यवरांना मानपत्र दिले होते. ते म्हणजे डॉ. बाबा आमटे आणि लता मंगेशकर यांनाही मानपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला होता.

बखरीच्या भाषेत सांगायचं, तर ‘सत्कार, गौरव व सन्मान यांचे हिरे, मोती व माणके अगणित. किती मोजावीत! इतर रुपये व नाणीही अगणित. हिसाब तो काय ठेवावा!’

माझ्या आयुष्यात काही आश्चर्यकारक योगायोग आहेत. ते आठवल्यावर मीही अचंबित होतो. विशेषतः नोव्हेंबर महिना हा माझ्यासाठी नेहमीच खूपच लकी ठरत आलेला आहे. नोव्हेंबर किंवा त्याच्या आसपासच्या कालावधीत माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडलेल्या आहेत. माझा जन्मच पाच नोव्हेंबरचा. सियाचीन हॉस्पिटलचं उद्घाटन 18 नोव्हेंबर 2001 चं, तर कोल्हापूर महापालिकेनं मानपत्र प्रदान करून माझा गौरव केला, तो 13 नोव्हेंबर 1999 ला. तसेच मला ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळाला, तोही नोव्हेंबर 2000 मध्येच! शिवाय नोव्हेंबरच्या उंबरठ्यावर म्हणजेच 30 ऑक्टोबर 2001 रोजी मला ‘एकमत’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यातील आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे, माझे मित्र आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीत तीन समारंभ झाले. एकमत पुरस्कार हा विलासरावांच्या मातोश्री सुशीलादेवी देशमुख यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येतो. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात मी हे योगायोग आवर्जून सांगितले. माझ्या द़ृष्टीनं पुरस्काराच्या रकमेपेक्षा हा समारंभ महत्त्वाचा होता. पुरस्कारामध्ये ट्रॉफी आणि रुपये अकरा हजार रोख असा समावेश होता. पुरस्काराच्या रकमेत मी स्वतःजवळचे आणखी अकरा हजार रुपये घालून लातूर पत्रकार संघाला देणगी म्हणून दिली. अशा तर्‍हेनं पुरस्काराची रक्कम देणगी स्वरूपात लगेच तिथल्या तिथं जाहीर करणारा मी पहिलाच पत्रकार होतो, हे मला नंतर समजलं. गोविंद तळवलकरांपासून अनेकांना यापूर्वी हा पुरस्कार मिळाला होता; पण यापैकी कुणालाच कसं काय हे सुचलं नाही, याचं आश्चर्य वाटलं.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं 16 ऑगस्ट 2001 रोजी या पुरस्काराची घोषणा केली आणि 30 ऑक्टोबरला त्याचं वितरण करण्यात आलं. सियाचीन हॉस्पिटलचं उद्घाटन 18 नोव्हेंबरला होणार होतं. मी त्या गडबडीत होतो. परंतु, विलासरावांच्या प्रेमापोटी त्या घाईगडबडीतही लातूरला गेलो. पुरस्कार समारंभ मात्र लक्षात राहण्यासारखा झाला. तेव्हाचे विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते मला पुरस्कार देण्यात आला. माझ्यासह गुजराथी, खुद्द विलासराव आणि शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या भाषणातल्या कोपरखळ्यांनी समारंभाला चांगलीच रंगत आणली.

“मातोश्रींच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार एकमत परिवाराचा आहे. पुरस्काराच्या निमित्तानं चांगले वक्ते येतात. लातूरकरांच्या मेंदूची मशागत होते. कार्यक्रम संपला तरी त्याचा प्रभाव लोकांच्या मनावर चार-सहा महिने तरी टिकून असतो,” असं विलासराव म्हणाले. समारंभात बोलताना विलासरावांनी आमच्या पुण्यातील कॉलेजमधल्या मैत्रीच्या संबंधांना पुन्हा उजाळा दिला.

ते म्हणाले, “आम्ही विधी महाविद्यालयात शिकत होतो, तेव्हा आम्हाला तरी कुठे ठाऊक होतं की, बाळासाहेब पुढे जाऊन मोठे संपादक होणार आहेत आणि मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे!”
विलासरावांच्या या वक्तव्यावर सभागृहात हास्याची लाट उसळली. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “बाळासाहेब राजकारणात का पडत नाहीत, असा प्रश्न मला अनेकवेळा पडतो. परंतु खरं तर, ते एकाअर्थी ‘पुढारी’च आहेत.
कारण ते ‘पुढारी’चेच संपादक आहेत.

त्यांना पुन्हा राजकारणात पडण्याची गरजच काय! त्यांचं ‘पुढारी’पण सामान्यांना, कष्टकर्‍यांना आणि शोषितांना आवाज देण्यासाठी आहे. स्पर्धेनं वेगवान बनलेल्या वृत्तपत्र क्षेत्रात बाळासाहेबांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचा सन्मान म्हणजे कोणत्याही दबावाला किंवा आमिषांना बळी न पडलेल्या निर्भीड पत्रकारितेचा सन्मान आहे.”
विलासरावांच्या या गौरवपूर्ण उद्गारावर सभागृहात टाळ्यांचा गजर दुमदुमला.

सत्कार समारंभाला उत्तर देताना मी म्हणालो, “विलासरावांचं नशीब सिकंदर आहे. काँग्रेसला जेव्हा पूर्ण बहुमत असायचं, तेव्हा त्यांना मुख्यमंत्रिपदाचे सूचक किंवा अनुमोदक व्हावं लागलं! आणि आता पक्षाचे केवळ 76 आमदार असताना त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा योग आला. एक उमदं राजबिंडं व्यक्तिमत्त्व असलेला उत्साही, अभ्यासू आणि खंबीर प्रशासक मुख्यमंत्री त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणेच विलासरावांचं नेतृत्वही आपत्तीच्या काळात घडलं. यशवंतरावांचे अनेक मानसपुत्र महाराष्ट्रात आहेत; पण खर्‍या अर्थानं त्यांचा वारसा विलासरावच पुढे नेत आहेत.”
माझ्या या सडेतोड आणि प्रांजळ उद्गारांनी सभागृह भारावून गेलं आणि काही काळ टाळ्यांचा गजर होतच राहिला.

पत्रकारितेशी संबंधित कोणताही समारंभ असला, तर मी माझ्या भाषणात वृत्तपत्र क्षेत्रातील वास्तव परिस्थितीचं चित्र आवर्जून मांडतो. येथेही मी पत्रकारितेचा निर्भीडपणा आणि इथं होत असलेलं बाह्यशक्तीचं आक्रमण या बाबींवर प्रकाश टाकला. मी पुढे म्हणालो,

“मानवी जीवनातील एक एक शाश्वत आधार ढासळत असल्याच्या काळात आपण जात आहोत. निष्ठा विकाऊ बनत आहेत. भ्रष्टाचार शिष्टाचार बनून मिरवत आहे. अशा वेळी पत्रकारिता हाच मानवजातीचा आधार बनू शकतो. पत्रकारितेची विश्वासार्हता कधी नव्हे एवढी मोलाची बनली आहे. वृत्तपत्रं स्वतंत्र असली, तरी हे स्वातंत्र्य अनिर्बंध मुळीच नाही. आपलं स्वातंत्र्य हे दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी नाही, याचं भान पत्रकारितेनं ठेवणं आवश्यक आहे.”

“संसद, प्रशासन यंत्रणा आणि न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या तीन आधारस्तंभात सुसंवाद नसल्यानं वृत्तपत्र या चौथ्या स्तंभाची जबाबदारी आता अधिकच वाढलेली आहे. मात्र, आज वृत्तपत्रांशी काडीचाही संबंध नसलेल्या बाह्यशक्तींचं आक्रमण या क्षेत्रावर वाढलं आहे. या अपप्रवृत्ती रोखल्या नाहीत तर निकोप, प्रामाणिक आणि लोकाभिमुख पत्रकारिता धोक्यात येऊ शकते. सरकारवर अंकुश ठेवण्याचं विरोधी पक्षाचं काम आता वृत्तपत्रांनी करणं गरजेचं आहे.”

माझ्या या सडेतोड प्रतिपादनानं सभागृहात कमालीची शांतता पसरली होती. प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांच्या गजरातच, एक उद्गारचिन्ह मागे ठेवूनच मी माझ्या भाषणाला पूर्णविराम दिला.

त्यानंतर शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे हे आपल्या भाषणात म्हणाले, “संगीतात वेगवेगळी घराणी असतात. त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात ‘पुढारी’ हे एक वेगळं घराणं आहे. कोणाच्या रागालोभाची पर्वा न करता, महाराष्ट्राच्या भल्याचा विचार मांडणारी पत्रकारिता जाधव घराण्यानं केलेली आहे. पत्रकारितेचा वारसा वडिलांकडून प्रतापसिंह जाधव यांना मिळाला; पण या मिळालेल्या पुण्याईत भर टाकण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी निष्ठेनं पत्रकारितेचं व्रत सांभाळलं आहे.”

रामकृष्ण मोरे यांच्या शब्दांनी माझ्या नजरेपुढे क्षणभर आबांचं कार्यकर्तृत्व तरळून गेल्याशिवाय राहिलं नाही. विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी आपल्या भाषणात या समारंभाचं आणखी एक औचित्य स्पष्ट केलं. ते म्हणाले,

“मुख्यमंत्री या नात्यानं शासनाच्या वतीनं विलासरावांनी बाळासाहेबांचा अनेकवेळा गौरव केला असला, तरी एकमत पुरस्काराच्या निमित्तानं, विधानसभा अध्यक्ष या नात्यानं, माझ्या हातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं हा गौरव होत आहे.”

गुजराथी यांच्या या विधानावर टाळ्यांचा कडकडाट झाला. पत्रकारिता हा मी माझा धर्म मानतो. गुजराथी यांनी भाषणात नेमकं तेच सांगितलं. हासुद्धा एक योगायोगच.

मी उभ्या आयुष्यात अनेक पदव्या मिळवल्या. बी. ए. झालो. एलएलबी केलं. जर्नालिझमचा कोर्स पूर्ण केला. मग सन्माननीय डॉक्टरेटपर्यंतही मजल मारली. त्याचबरोबर ‘पद्मश्री’सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या सन्मानासह अनेक पुरस्कार मला प्राप्त झाले. अगदी अलिकडेच म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आचार्य अत्रे पुरस्काराने माझा गौरव करण्यात आला. अर्धशतकाहून अधिक काळ संपादक म्हणून केलेल्या कार्याचा हा सन्मानच आहे, असं मी मानतो.

अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले असले तरीही माझे पाय जमिनीवरच राहिले. कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान मला आजही श्रेष्ठ वाटतं. पुस्तकी शिक्षण हा केवळ एक सोपस्कार असतो. खरं शिक्षण तर जगाच्या उघड्या विद्यापीठातच मिळत असतं आणि अशा तर्‍हेनं जगाच्या उघड्या विद्यापीठात घेतलेल्या शिक्षणामुळेच मी माझं जीवन समृद्ध करू शकलो. त्या समृद्धतेतूनच मला दुसर्‍याचं जीवन समृद्ध करण्याची प्रेरणा मिळाली.

माणसाला जर स्वतःबरोबरच दुसर्‍यानं जीवन समृद्ध करता आलं नाही, तर त्याची समृद्धी कुचकामी असते. म्हणूनच मला एकट्याला कधीच समृद्ध व्हायचं नव्हतं. मला माझ्याबरोबर समाजालाही सोबत घेऊन जायचं होतं. याच अंत:प्रेरणेतून सियाचीन आणि अधोईसारख्या दुर्गम ठिकाणची हॉस्पिटलं उभी राहिली, हे विसरता येणार नाही. म्हणूनच माझ्या सर्व पदव्या, पुरस्कार आणि गौरव-सन्मान हे माझ्या सामाजिक योगदानाची पोचपावतीच आहे, असं मी मानतो.

Back to top button