जळगाव : दारुसाठा चोरणारे दोघे गजाआड | पुढारी

जळगाव : दारुसाठा चोरणारे दोघे गजाआड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; जामनेर तालुक्यातील झाडेगाव नेरी येथील शशिप्रभा हॉटेलमध्ये शटरचे कुलूप तोडून एक लाख दहा हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला होता. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 54 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील शशिप्रभा हॉटेल मध्ये दि. 18 रोजी रात्री 10:00 वाजता ते दि 19 रोजी सकाळी 10:00 वाजेच्या दरम्यान शशीप्रभा हॉटेलच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन 1 लाख 10 हजार 245 रुपयांचा देशी विदेशी दारुचा मुद्देमाल चोरी झाला होता. या बाबतीत शशीप्रभा हॉटेलचे मॅनेजर शिवाजी दौलत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जामनेर पोलिस स्टेशला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना ही चोरी  एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण, रा. मच्छी मार्केट, सुप्रीम कॉलनी, जळगाव व सागर लक्ष्मण वाधवानी, रा. बाबा नगर, सिंधी कॉलनी, जळगाव या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय या दोघांनी गुन्हा देखील कबुल केला आहे.  त्यांच्याकडून 54 हजार 567 रुपयांचा विदेशी दारुचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. अतुल वंजारी, पो. ना. किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी केली. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कार्यवाहीसाठी जामनेर पो. स्टे. चे पो. ना. अतुल पवार, पो. ना. राहुल पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई ही जामनेर पोलीस करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button