नाशिक : भोंग्यांची ध्वनी तीव्रता मोजण्यास सुरुवात | पुढारी

नाशिक : भोंग्यांची ध्वनी तीव्रता मोजण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार परिसरनिहाय आवाजाची क्षमता राखून भोंग्याचा आवाज मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (दि. 19) सय्यद पिंप्री परिसरातील मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची तीव्रता मोजली. यावेळी नाशिक तालुका पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवासी, वाणिज्य, औद्योगिक व शांतता परिक्षेत्रानुसार दिवसा व रात्रीची आवाजाच्या पातळीची तीव्रता आखून दिली आहे. या पातळीच्या आत आवाज ठेवणे बंधनकारक आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करीत 3 मेपर्यंत भोंगे न उतरवल्यास मंदिरांवर भोंगे लावून त्यावरून हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा दिला आहे. राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. शहरात पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनीही आदेश काढून 3 मेपर्यंत भोंगे लावण्यास लेखी परवानगी घेण्याचे आदेश दिले असून, मशिदींच्या 100 मीटरजवळील परिसरात भोंगे लावण्यास बंदी घातली आहे.

त्याचप्रमाणे आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितास कारावास, आर्थिक दंडाची शिक्षा किंवा तडीपारी किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पाण्डेय यांनी दिला आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी सय्यद पिंप्री येथील मशिदींवरील भोंग्याच्या आवाजाची तीव्रता मोजली. यावेळी नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यापुढे पोलिसांनाही आवाजाची तीव्रता मोजावी लागणार असल्याने पोलिसांनीही याबाबत प्रात्यक्षिक करून पाहिले.

आवाजाच्या तीव्रतेचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत आवाजाच्या तीव्रतेच्या नोंदी घेतल्या जात आहेत. विनापरवानगी भोंगे लावू नये अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल. पोलिस उपअधीक्षक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या निगराणीखाली या नोंदी घेतल्या जात आहेत.
– सचिन पाटील,
पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

हेही वाचा :

Back to top button